फडणवीसांनी नावं जाहीर करावी – रोहित पवार
पुणे हे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील उद्योग क्षेत्रात ‘दादागिरी’मुळे विकासाला खीळ बसत असल्याचे वक्तव्य केले.
त्यांनी गुंतवणूकदारांवर “आमच्या माणसांनाच काम द्या, आम्हालाच कंत्राट द्या” असा दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत फडणवीसांवर जोरदार टीका केली.
रोहित पवार म्हणाले, पुण्यातून कंपन्या बाहेर जात आहेत. तळेगाव, चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस दादागिरीचा उल्लेख करतात, मग ते काय करत आहेत? पुण्याच्या एमआयडीसीत अजितदादांच्या पक्षाची दादागिरी आहे, भाजपची आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची? फडणवीसांनी दादागिरी करणाऱ्यांची नावे स्पष्टपणे जाहीर करावीत.” त्यांनी पुढे शंका उपस्थित केली की, कंपन्या गुजरातला जात असल्यास यामागे कदाचित भाजपचीच भूमिका असावी.
याचवेळी, राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या “वाकडं काम करून सरळ करणाऱ्यांची नोंद ठेवली जाते” या वादग्रस्त वक्तव्यावरही रोहित पवारांनी टीका केली. ते म्हणाले, “भरणे यांनी वाकडं काम करून सरळ करण्याचे सांगितले, पण त्यांनी महाराष्ट्राची तिजोरी वेडीवाकडी केली आहे. कृषिमंत्रीपद वाकडं काम करण्यासाठी दिलेले नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी आहे, पण वाकडं काम केल्यास महाराष्ट्र आणि आम्ही तुम्हाला माफ करणार नाही.
या प्रकरणाने पुण्यातील औद्योगिक विकास आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे. रोहित पवारांच्या या हल्लाबोलाला फडणवीस आणि भरणे काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आम्ही तुम्हाला माफ करणार नाही : रोहित पवार
वाकडी काम पण सरळ करावी लागतात, असं नवीन कृषिमंत्री म्हणाले. त्यावर महाराष्ट्राचे तिजोरी वेडीवाकडी केली आहे, वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्री पद दिलं नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या मी पाठीशी राहतो, वाकड काम जर तुमच्या हातून झालं तर महाराष्ट्र माफ करणार नाही. आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.
