शहरातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण तापले आहे. शहरात माझी ३० टक्के जमीन असती तर मंत्री प्रताप सरनाईक हे माझ्या बरोबरीचे तर सोडाच, ५०० फूट लांब असते; ते माझे ड्रायव्हर असते, असे विधान मेहता यांनी केले आहे.
या वक्तव्यानंतर शिंदे शिवसेना गटातून संताप व्यक्त होत असून पूर्वेश सरनाईक यांनी मेहता यांना खुले पत्र देत इशारा दिला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
काशिगाव मेट्रो स्थानकाच्या पार्किंगसह जनहिताच्या कामांसाठी आमदार मेहता यांनी जमीन द्यावी, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवले होते. यावर प्रतिक्रिया देताना मेहता म्हणाले की, मंत्री सरनाईक जे बोलतात, ते गांभीर्याने घेण्यासारखे नसते. ते बोलतात तसे करत नाहीत. याचवेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करत सरनाईकांवर टीका केली. पूर्वेश सरनाईक यांच्या पत्रावर प्रत्युत्तर देताना आमदार नरेंद्र मेहता यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
पूर्वेश यांनी आधी आपल्या वडिलांना संस्कार शिकवावेत. सरनाईक मला ‘मदारी’ म्हणतात ते चालते; मात्र माझ्याकडेही त्यांची आणि पूर्वेश यांची ‘इन्साइड स्टोरी’ आहे, असा इशारा मेहता यांनी दिला. दरम्यान, पूर्वेश सरनाईक यांनी खुले पत्राद्वारे मेहता यांना संयम व जबाबदारीचे भान राखण्याचा सल्ला दिला. मेहतांचे वक्तव्य हे राजकीय संस्कृतीचा खालावलेला स्तर दर्शवणारे आहे. आमच्या पक्षाने कधीही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वर्तन केले नाही. संयम हा आमचा स्वभाव आहे, कमजोरी नाही, असा इशारा त्यांनी दिला.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री मेहतांनी मला ड्रायव्हर म्हटले, त्याचे वाईट वाटले नाही. ड्रायव्हर असणे वाईट नाही; मात्र मेहतांना माझ्यासारखा ड्रायव्हर चालणार नाही, कारण त्यांच्या अनेक गोष्टी उघड होतील. मात्र ठाण्यावरून कोणी मूर्ख येतो, असे म्हणणे चुकीचे आहे.
