
अख्खी शेतकरी संघटना ठाकरेंच्या सेनेत विलिन; विदर्भात बळ वाढणार ?
आज मातोश्रीवर विदर्भातील नेते, कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पश्चिम विदर्भात उद्धव सेना ताकद वाढवत आहे. या पट्यात यापूर्वीची मोठी फळी शिंदे सेनेत गेल्याने या ठिकाणी नवीन नेतृत्वाला मोठा वाव आहे.
जुन्या फळीतील नेते आता पक्ष बांधणीसाठी सरसावले आहेत. बुलडाण्याचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी मातोश्रीवर मोठी शक्ती पणाला लावली. त्यांनी जिल्ह्यात सेनेची ताकद वाढवण्याचा चंग बांधला आहे.
शेतकरी क्रांती संघटना ठाकरे सेनेत विलीन
या भागातील शेतकरी क्रांती संघटना आज ठाकरे सेनेत विलीन झाली. घाटावर आणि घाटाखाली या दोन्ही पट्ट्यात या संघटनेचे काम आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिलेवर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा आज मातोश्रीवर प्रवेश सोहळा झाला. यामुळे पश्चिम विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांना हुरूप आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापसून अनेक घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेते मोठे बदल केले आहेत. तर त्या पाठोपाठ भाजपने जम्बो कार्यकारणी समोर आणली आहे. इतर पक्ष सुद्धा मरगळ झटकत असतानाच आता उद्धव सेना पण अधिक सक्रीय झाली आहे. शेतकरी क्रांती संघटना आणि इतर अनेकांचा आज मातोश्रीवर प्रवेश झाला. त्यामुळे ठाकरे गटाला आगामी स्थानिक निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो. तर संजय देरकर वणी विधानसभा यांचा नेतृत्व खाली 3 जिला परिषद सदस्य यांची 45 सरपंच पक्ष प्रवेश केला आहे.
अनेक जुनी माणसं माझ्यासोबत
यावेळी शेतकरी क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. अनेकजण शिवसेना संपवायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांना संपवायला निघाले आहेत. त्यांना आता खरा प्रश्न पडला आहे की, उद्धव ठाकरे हे संपत का नाहीत? सगळीच माणसं काही पैशांनी विकली जात नाहीत. काही गद्दार पैशांनी विकले जाऊ शकतात. पण निष्ठावंत विकेल जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच माझ्यासोबत माझे सगळेच जुने सहकारी आहेत. आपण ज्या लोकांना मोठे केले ते आपल्याला सोडून गेले. पण ज्यांना त्या लोकांना मोठे केले, ती माणसं आज माझ्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.