
मुजोर कन्नडिगांना हिसका दाखवणार…
लोकसभा,विधानसभेनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांनी विविध पक्षांतील काठावरच्या नेत्यांना आपआपल्या पक्षात आणण्यासाठी गळ टाकण्यास सुरूवात केली आहे.
त्यामुळे सर्वच पक्षांत इनकमिंग-आऊटगोईंग सुसाट आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात एकावर एक धक्के दिल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात एन्ट्री घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत बेळगावातील 12 मठाधिपतींनी सोमवारी (ता.4) पक्षप्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदिराचे मठाधिपती पुरुषोत्तम माळी महाराज यांच्यासह चिकोडीमधील महाराजांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. या महंतांच्या पक्षप्रवेशामुळे कर्नाटकातील बेळगावमध्ये शिवसेना पक्षाची ताकद वाढली आहे.
ठाण्यातील आनंद आश्रम याठिकाणी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केलेल्यांमध्ये पुरुषोत्तम माळी महाराज यांच्यासह सागर बागडी, सुषमा खरात, अरविंद शिरळाकर, दादा महाराज, अजय घराडे, नूतन धनावडे, बाळकृष्ण कांबळे, सुवेल शेट्टे, मयूर गुरव, साई पाटील, अनिकेत वरके, दीपा फडणवीस या सगळ्यांचा समावेश आहे.
याबाबत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.त्यांनी ट्विटमध्ये कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील खडकलाट गावचे श्री दत्त गगनगिरी ध्यान मंदिराचे मठाधिपती परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज यांनी आपल्या असंख्य अनुयायांच्या साथीने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे पक्षात आदरपूर्वक स्वागत केल्याचं सांगितलं आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदेंनी राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठे असते असे मानणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझ्याकडून जे शक्य होते, तेच मी पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी आणि आध्यात्मिक गुरुंसाठी केले असल्याचं म्हटलं. तसेच हे कार्य यापुढेही करत राहणार असल्याची ग्वाही पण त्यांनी दिली.
आध्यात्मिक क्षेत्रात #महाराष्ट्र आणि कर्नाटकात कार्यरत असतानाही आपण शिवसेनेच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून प्रवेश केलात हा शिवसेना पक्षाचा मी बहुमान समजतो. याच आनंदआश्रमात साधू-संतांचा यथोचित मानपान आमचे वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब करत असतं. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मराठी आणि हिंदुत्वाचा कायम पुरस्कार केल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मागील तीन वर्षांपासून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत असल्याचं म्हटलं. तसेच हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. महाराष्ट्र हा साधुसंताचा आहे.पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन साधुंची हत्या देशानं पाहिली, असा हल्लाबोलही शिंदे यांनी केला.
महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊ या, शिवसेना संतांच्या पाठीशी आहे, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हणाले. तसेच हिंदुत्वाला दहशतवादाशी जोडण्याचा जो कट काँग्रेसने रचला होता तो माननीय न्यायालयाने हाणून पडल्याचंही शिंदे यांनी ठणकावलं.