
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला…
मंत्री संजय शिरसाट यांनी निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या काय बापाचं जातं, असं वक्तव्य केलं होतं, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता.यावर शिरसाटांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जपून बोलण्याचे आदेश दिलेत ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. बोली भाषेत कोणी काही बोललं तर त्याचा विपर्यास होतो, मात्र त्याबाबत आम्ही काळजी घेत असल्याचं शिरसाटांनी सांगितल आहे.
महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल- फडणवीस
वॉर रूम बैठकीत मुंबईतील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत महायुतीच निवडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केला. महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी-गैरमराठी असा कोणताही वाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत मराठी आणि गैर-मराठी लोक अनेक पिढ्यांपासून एकत्र राहत आहेत, त्यांच्यात कधीही वैर किंवा मारामारी झाली नाही. एखादी घटना भाषेमुळे नसते, ती इतर कारणांमुळे असते. निवडणुका जवळ असल्याने काही लोक महाराष्ट्रात भेद निर्माण करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार
येत्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. त्यासोबतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका २०१७ साला प्रमाणेच होणार असल्याने सीएम देवेंद्र फडणवीसांनी प्रसार आनंद व्यक्त केला आहे. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र या याचिका आता न्यायालयानं फेटाळल्या आहेत, त्यामुळे आता नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीएम देवेंद्र फडणवीसांनी प्रसार माध्यमाशी बोलताना आनंद व्यक्त केला आहे.
नव्या प्रभाग रचनेस आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली आहे. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या आहेत. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र या याचिका आता न्यायालयानं फेटाळल्या आहेत, त्यामुळे आता नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली आहे.
तीन पक्षांचे बडे नेते असणार उपस्थित
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची मंगळवारी उद्या बैठक होत आहे. या बैठकीस महायुतीमधील तीन पक्षांचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
मंत्री छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी साडेचार महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी अद्याप शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही. 4 मार्च रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, नियमानुसार पुढील 15 दिवसांच्या आत बंगला रिकामा करणे अपेक्षित होते. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली. त्यानुसार, 23 मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेशही जारी झाला. मात्र, अद्याप भुजबळ यांना शासकीय निवास मिळालेला नसल्याने ते गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय.
कोल्हापूरात ठाकरेंची सेना आक्रमक, महानगरपालिकेला घेराव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव घातला. कोल्हापुरातील विविध प्रलंबित समस्यांसंदर्भात ठाकरेसेना आक्रमक झाली आहे. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
नाशिकमध्ये मनसेचा हंडा मोर्चा
नाशिकमध्ये मनसेने महापालिकेसमोर मोर्चा काढला आहे. नाशिकमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरात अनेक भागात वेळेवर प्यायला पाणी नाही. याविरोधात मनसेने महापालिकेसमोर हंडा मोर्चा काढला आहे. मनसेचे दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात महापालिकेसमोर हा मोर्चा काढण्यात आला असून मनपा आयुक्तांचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आल्याचे दिनकर पाटील म्हणाले. भाजपच्या शहरातील आमदारांवरही त्यांनी निशाणा साधला.
मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार : राज ठाकरेंना विश्वास
मराठीचा मुद्दा घराघरात पोहचवा. मराठीचा मुद्दा पोहचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करु नका. हेवे-दावे संपून कामाला लागा. २० वर्षांनंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ येऊ शकतो तर तुम्ही का भांडत आहात? स्थानिक मुद्द्यांसाठी ग्राउंडवर उतरुन काम करा. कुणालाही न घाबरता आत्मविश्वासाने काम करा. अशा सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिल्या. तसेच मनसे मुंबई महापालिकेत नक्की १०० टक्के सत्तेत येणार असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन
दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीबाबत राज्यात चर्चा सुरु आहे. दरम्यान, आता राज ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं राज ठाकरे म्हणाल आहेत.
राहुल गांधी काढणार ‘मतदाता अधिकार यात्रा’
तेजस्वी यादव यांच्याकडे दोन मतदान कार्ड असल्याचा पुरावा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाने त्यांना नोटिस पाठवली आहे. या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवसापासून काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी हे बिहारमध्ये ‘मतदाता अधिकार यात्रा’काढणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण,पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम आज उपस्थित नव्हते. विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे, आरोपीचे वकील विकास खाडे न्यायालयात हजर होते. आरोपी वाल्मिक कराड यांच्या मालमत्तेबाबत आज न्यायालयात बाजू मांडण्यात आली.
डान्सबार वर ही दगडफेक,एकाला अटक
पनवेलमधील डान्सबॉरवर शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती, याप्रकरणी पनवेल पोलिसांनी कारवाई केली आहे. योगेश चिल्ले यांनी पोलिसांनी अटक केली आहे. नाईट रायडर या डान्सबार वर ही दगडफेक झाली होती.
अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार
पुण्यात तीन दलित मुलींचा कोथरुड पोलिस ठाण्यात छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्या आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या लवकरच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्लीत
अलमट्टी धरणाप्रकरणी आज केंद्र सरकारसोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांची बैठक आहे. महाराष्ट्र सदनात 12 वाजता आमदार- खासदारांची याबाबत बैठक होणार आहे. शिष्टमंडळात सर्वपक्षीय 12 लोकप्रतिनिधींचा समावेश असून केंद्रीय मंत्री सी आर पाटील उपस्थित राहणार आहे.
माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. झारखंड राज्याची स्थापना झाल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष स्थापन करून त्यांनी राजकारण केले. त्यांचे पुत्र हेमंत सोरेन हे झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
जतिन प्रजापती भाजपमध्ये
कल्याण डोंबिवलीमधील सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
मंत्रिपद सोडून पाच महिने तर धनंजय मुंडे सरकारी बंगाल्यातच
धनंजय मुंडे यांची पाच महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतर त्यांनी त्यांना मिळालेला शासकीय बंगला सोडलेला नाही. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे अजुनही बंगल्याच्या प्रतिक्षेत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज 11 देखील या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आरोपी वाल्मीक कराडच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर निर्णय होणार आहे.तसेच वाल्मीक कराडचे वकील वाल्किच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करणार आहेत. विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब फुले आज विशेष न्यायालयात सरकारच्या बाजुने काम पाहणार आहेत.
रोहित पवार रात्री तीन वाजता पोलिस ठाण्यात
कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल व्हावा म्हणून दोन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत होते. मात्र पोलिसांकडून याची दखल घेतली जात नव्हती. रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर हे पोलिस आयुक्तालयात दाखळ झाले. पोलिसांनी तक्रार घेतली नसली तरी जनमताच्या दबावापुढे झुकत पोलिसांकडून तसं लेखी मात्र आम्ही घेतलं. पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांना अशाच प्रकारे त्रास देणार असेल तर आम्हीही ‘आवाज खाली’ असाच प्रतिसाद देऊ. झोपलेले गृहमंत्री जागे होतील, ही अपेक्षा!, असे रोहित पवार म्हणाले.
‘वंचित’चे मध्यरात्री पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
कोथरुड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेल्या छळाच्या विरोधात अत्याचारित तीन महिला, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते १ ऑगस्टपासून सकाळी १०.३० वाजल्यापासून पोलिस आयुक्त (CP) कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यानेवंचितच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.