दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण):
पैठण तहसील कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर युनिटने आज (04 ऑगस्ट) सापळा रचून कोतवाल आणि तलाठीला रंगेहात पकडले.
तक्रारदार (वय 39) यांची मौजे अगर नांदूर, ता. पैठण येथे शेती जमीन असून, वाटणीपत्र तयार करण्यासाठी त्यांनी कागदपत्रे कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे (वय 36, आपेगाव) यांच्याकडे दिली होती. तक्रारदारांनी विचारणा केली असता, कोल्हे यांनी प्रस्ताव तलाठीकडे पाठविण्यासाठी 10,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली.
4 ऑगस्ट रोजी शासकीय पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली असता, कोल्हे यांनी 8,000 रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच दिवशी तहसील कार्यालयात सापळा रचून, कोल्हे यांनी तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले (वय 30, पैठण) यांच्या संमती व प्रोत्साहनाने तक्रारदारांकडून 8,000 रुपये स्वीकारले. दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. कोल्हे यांच्याकडून मोटरोला Edge 50 मोबाईल, 10,100 रुपये रोख आणि लाचेची रक्कम 8,000 रुपये जप्त करण्यात आले. बिनीवाले यांच्याकडून OnePlus 11R मोबाईल आणि 100 रुपये रोख जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींच्या मोबाईलची तपासणी सुरू असून, घरझडती प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे (तपास अधिकारी), पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर (सहाय्यक अधिकारी), पो.अं. राजेंद्र नंदिले, युवराज हिवाळे, सी.एन. बागुल यांनी सहभाग घेतला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
नागरिकांना आवाहन:
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी, अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती, कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. टोल फ्री क्र. 1064 किंवा मोबाईल क्रमांक 9011092777 वर तक्रार नोंदवता येईल.