दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी – विकी जाधव
—————————–
ठाणे, दि.04(जिमाका) :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातंर्गत वैध मापनशास्त्र यंत्रणा कार्यरत असून या यंत्रणेच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता वाढवणे, लोकसंपर्क दृढ करणे व ग्राहक तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे या उददेशाने जिल्हा कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबार आयोजित करण्याचे विभागाने निश्चित केलेले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य ग्राहक, ग्राहक संघटना, पॅकबंद वस्तूंचे उत्पादक/पॅकर/आयातदार, किरकोळ विक्रेते/व्यापारी, वजन मापाचे परवानाधारक उत्पादक, दुरूस्तक व विक्रेते इ. घटकांना थेट संवाद साधण्यासाठी दि.05 ऑगस्ट 2025 रोजी ठिक 12.00 वाजता, 2 रा माळा, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे (प) ठाणे येथील उपनियंत्रक वैध मापनशास्त्र, ठाणे जिल्हा क्र.1, ठाणे यांच्या कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आलेला आहे.
ठाणे जिल्हा क्र.1 जिल्ह्यातील ग्राहक संघटना, पॅकबंद वस्तूंचे उत्पादक/पॅकर/आयातदार, किरकोळ विक्रेते/व्यापारी, वजन मापाचे परवानाधारक उत्पादक, दुरूस्तक व विक्रेते इ. यांना आवाहन करण्यात येते की, वैध मापनशास्त्र यंत्रणेशी संबंधित सुचना / तक्रारी इ. चे जनता दरबाराच्या माध्यमातून निरसन तात्काळ करण्यात येणार
आहे. याचा सर्वानी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे वैध मापन शास्त्र, ठाणे जिल्हा क्र.1, ठाणे उपनियंत्रक रा.फ. राठोड यांनी कळविले आहे.