
दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार…
दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फिडिंग करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यां नी दिल्या
त्यावर आता मुंबईतील जैन समूदायाने आनंद व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या निर्देशानंतर आता कबुतरखान्यावरील ताडपत्री तातडीने हटवणयात येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद केले. परंतु त्यावरून गुजराती जैन समूदाय मात्र आक्रमक झाल्याचं दिसून आला. कबुतरांना खाऊ घालण्याचा आम्ही टॅक्स देऊ, पण कबुतरखाना पुन्हा सुरू करा अशी मागणी त्यांनी केली. त्यातच राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही त्याला पुरक भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
कबुतरांना मर्यादीत स्वरुपात खाणं देणार
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “कबुतरखाना ताडपत्री टाकून बंद केला होता, ती ताडपत्री आता काढण्यात येणार आहे. मी हृदयापासून हिंदू समाज, जैन समाज अहिंसक समाजातर्फे देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. त्यांनी लोकांची भावना समजून निर्णय घेतला. या निर्णयानुसार कबुतरखान्यात आजपासून मर्यादित स्वरुपात कबुतरांना खाणं दिलं जाईल.”
मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, “या संबंधी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. कबुतरखान्याच्या पाण्याची जी लाईन कट करण्यात आली होती ती पुन्हा जोडण्यात येणार आहे. टाटाची अत्याधुनिक मशिन वापरुन कबुतरखाना आणि परिसराची साफसफाई केली जाईल. याचा कुणाला काही त्रास होणार नाही असे काम केले जाईल. लोकांच्या आरोग्याची सर्व खबरदारी घेऊ.”
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई महानगरपालिकेने नुकताच दादर परिसरातील कबुतरखाना बंद केला होता. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताडपत्री टाकून हा कबुतरखाना पूर्णपणे झाकला होता. त्यामुळे याठिकाणी बसण्याची सवय लागलेल्या कबुतरांना दुसरी जागा उरली नव्हती. परिणामी या कबुतरांनी आजुबाजूच्या इमारती आणि दुकानांच्या छतावर आश्रय घेतला होता. खाणं न मिळाल्यामुळे या काही कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावाही स्थानिकांनी केला होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबुतरखाने बंद करु नयेत, या मागणीसाठी पुढाकार घेतला होता. जिथे कमी लोकवस्ती असेल अशा नॅशनल पार्क, आरे कॉलनी आणि महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरात नवीन कबुतरखाने उभारण्यात यावेत, असा प्रस्ताव मंगलप्रभात लोढा यांनी मांडला होता. आम्ही कबुतरांचा मृत्यू होऊन देऊ शकत नाही. त्यांना वाचवणे आमचे कर्तव्य आहे, असेही मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले होते.