
प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला !
अमेरिकेने भारतावर 50% आयातशुल्क (टॅरिफ) लावल्याच्या चर्चेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी देशाला निराश केले आहे आणि अमेरिकेने भारतावर लादलेला आर्थिक दबाव मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळेच आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी भारताला निराश केले आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के शुल्क लावले आहे, जे आतापर्यंत कोणत्याही देशावर लावले गेलेले सर्वाधिक शुल्क आहे. त्यांनी पुढे म्हटले की, भारत कधीही अशा आर्थिक दबावापुढे झुकलेला नाही आणि भविष्यातही झुकणार नाही, उलट तो नेहमीच आपल्या राष्ट्रीय हितासाठी उभा राहिला आहे.
या गंभीर आरोपांच्या मुळाशी जात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अमेरिकेतील राजकारणाचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, भारताने हे विसरू नये की, मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिंदू स्वयंसेवक संघ (HSS) आणि अमेरिकेतील इतर हिंदुत्ववादी संघटनांनी 2016, 2020 आणि 2024 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये भारतीय अमेरिकन नागरिकांना डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.
आणखी आयातशुल्क लादणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादल्यानंतर रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्यास तसेच त्यांच्याशी व्यापार सुरू ठेवल्यास आणखी कर लादण्याचा इशारा दिला होता. तो इशारा बुधवारी खरा ठरला. ट्रम्प यांनी अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावत असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे आता भारतीय वस्तुवर तब्बल 50 टक्के टॅरिफ द्यावा लागणार आहे. दरम्यान, पुन्हा आणखी आयात शुल्क लादण्याचा इशारा पुन्हा एकदा ट्रम्प यांनी दिला आहे.