
चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर !
तामिळनाडूत प्रसिद्ध अभिनेते विजय याच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ५८ हून अधिक लोक जखमी आहेत. शनिवारी तामिळनाडूतील करूर येथे ही चेंगराचेंगरी झाली, जिथे विजय यांच्या रॅलीसाठी मोठी गर्दी जमली होती.
या घटनेनंतर पंतप्रधान मोदींपासून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे. दुसरीकडे या घटनेनंतर अभिनेता विजय याने एक्स पोस्टवरुन आपली प्रतिक्रिया दिली.
तमिळनाडूतील करूर येथे तमिळगा वेत्री कझगम प्रमुख विजय याच्या एका भव्य राजकीय रॅलीत हजारो लोक जमले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रचंड गर्दीमुळे ही चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चेंगराचेंगरीनंतर विजय तिरुचिरापल्ली विमानतळावर दिसला. इतक्या मोठ्या घटनेनंतर विजय अशा पद्धतीने का निघून गेला, यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेवर विजयने दुःख व्यक्त केलं आहे. माझे हृदय तुटले आहे. शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत अशा असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःखाने मी थरथर कापत आहे. करूरमध्ये ज्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या मनापासूनच्या शोकसंवेदना व्यक्त करतो. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सगळे लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो, अशा शब्दात विजयने आपल्या भावना व्यक्त केल्या.
या दुर्घटनेनंतर तामिळनाडू सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने विजय याच्या करूर रॅलीतील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. तर चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी तात्काळ एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याची घोषणा तामिळनाडू सरकारने केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीसन या आयोगाच्या अध्यक्ष असतील.