
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यानंतर तो वाढवून त्यांनी आता 50 टक्के केला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे पडसाद भारतात तर उमटलेच आहेत, मात्र चीनने देखील त्यांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या या नव्या धोरणांचा जागतीक स्थरावर कसा प्रभाव पडणार? त्याचा अमेरिकेवर कसा परिणाम होऊ शकतो? याबाबत संरक्षण विश्लेषक सतीश ढगे यांनी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले ढगे?
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणताही देश कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, कायमचे असतात ते त्या देशांचे हितसंबंध. एकेकाळी अमेरिका हा आपला जवळचा मित्र होता, पण मागच्या काही काळात डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे खरोखरच अमेरिका भारताचा स्टेटर्जीक पार्टनर बनण्यासाठी लायक आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्याप्रमाणे ब्रिक्स ग्रुप आर्थिक दृष्ट्या उभारी घेतोय आणि त्यामुळे डॉलरचे महत्त्व कमी होईल हे डोनाल्ड ट्रम्प ओळखून आहेत, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशावर आर्थिक प्रहार करण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करत आहेत.
भारताने आपला मित्र रशिया सोबत डिफेन्स एक्सपोर्ट आणि क्रूड ऑइल खरेदी करण्याचा निर्णय असाच कायम ठेवावा. आशियाच्या दृष्टिकोनातून भारत आणि चीनचे आर्थिक संबंध येणाऱ्या काळात सुदृढ व्हायची गरज आहे. आज घडीला भारत आणि चीन यांच्यामधील आर्थिक संबंध मजबूत आहेत. चीन आणि भारताने एक दुसऱ्याशी संघर्ष करण्यापेक्षा सोबत येऊन आर्थिक सहकार्य वाढवण्याची गरज आहे.
हे सर्व ओळखून भारताचे पंतप्रधान चीनमध्ये जात आहेत, तर पुतीन हे भारताला भेट देत आहेत, त्यामुळे जागतिक पटलावर नवीन गणित निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत, चीन आणि रशिया एकत्रित येण्याने डॉलरची किंमत कमी होणार आहे, आणि त्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी दादागिरीला काबूत आणणे भारताला शक्य होणार आहे, असं ढगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे स्वकेंद्रित आणि व्यापारी मनोवृत्तीचे राजकीय नेतृत्व आहे. भारताविषयी केलेली त्यांची विधाने विपर्यास निर्माण करणारी आहेत. पाकिस्तानसोबतचं युद्ध थांबवण्यासाठी मी भारताला व्यापाराचा हवाला दिला, भारताला पाकिस्तानसोबतचं युद्ध थांबण्यासाठी बाध्य केलं, अशी डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा वल्गना करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि आता युद्ध थांबल्यानंतर अमेरिकेने सर्वात जास्त टेरिफ हा भारतासारख्या मित्र राष्ट्रावर लावला आहे, असंही यावेळी ढगे यांनी म्हटलं आहे.