
दैनिक चालु वार्ता, इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-फक्त शारीरिक स्वास्थासाठी नव्हे तर खेळाडूच्या मानसिक तंदुरूस्ती आणि एकंदर कल्याणामध्ये फिजिओथेरपिस्टची भूमिका ही मोलाची असते,असे प्रतिपादन नेमबाज व ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा यांनी केले.
संचेती हॉस्पिटल येथे अद्ययावत फिजिओथेरपी विभागाचे उद्घाटन अभिनव बिंद्रा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एच.संचेती,बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती, कार्यकारी संचालिका मनिषा संघवी, होम हेल्थकेअर व कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख रूपल संचेती आणि फिजिओ थेरपी विभागाच्या प्रमुख डॉ.दर्शिता नरवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिनव बिंद्रा म्हणाले की,माझ्या दोन दशकांहून अधिक कारर्किदीमध्ये दहा फिजिओथेरपीस्ट बरोबर मी काम केले. माझे त्यांच्याशी नाते विश्वासावर आधारित होते.खेळाडूंची कारर्किद ही दीर्घकालीन आणि आव्हानात्मक असते,कारण आम्ही दररोज परिसीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असतो.
एकेकाळी आपल्या प्रशिक्षकांबरोबर असलेल्या आव्हानात्मक नात्याबद्दल बोलताना ते म्हणाले की,माझे फिजिओथेरपीस्ट आमच्या दोघांमधील दुवा होते. चिकित्सेवेळेस प्रशिक्षकांचा दृष्टीकोन ते मला सांगायचे, यामुळेच नाते सुधारण्यास त्यांनी मदत केली.त्यामुळेच एकंदर कल्याणामध्ये फिजिओथेरपीस्टची भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची होती.असेच नाते हे फिजिओथेरपीस्टचे रूग्णांबरोबर देखील असते.रूग्णांच्या मनातील भीती दूर करण्यामध्ये ते मदत करतात.
राजीव बजाज म्हणाले की,या विभागाकडे तीन निकषातून पाहत असून त्यामध्ये वैयक्तिकृत सेवा,समग्र अनुभव आणि चैतन्य आहे.त्यामुळे हा विभाग एक उत्कृष्ट केंद्र आहे.
संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती म्हणाले की, अभिनव बिंद्रा यांनी आपला खेळ, अथक परिश्रम आणि अभिनव बिंद्रा फाऊंडेशन द्वारे अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेले अद्ययावत फिजिओथेरपी केंद्र हे रुग्णांबरोबर खेळाडूंना त्यांची क्षमता जाणून घेण्यासाठी तसेच उच्च कामगिरी करण्यास मदत करतील. हे केंद्र रुग्णांसाठी व खेळाडूंसाठी एक नवा टप्पा ठरेल.