
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा: म्हसळा शहराच्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होत असल्याने, मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी हे खड्डे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज श्रीवर्धन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले.
या निवेदनात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे म्हसळा शहराध्यक्ष माजिद सुभेदार आणि शहर उपाध्यक्ष सलमान मेमन यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले आहे. “शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, जे वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनले आहेत. स्थानिक नागरिकांना दररोज या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळा, आरोग्य सेवा आणि इतर कामांसाठी प्रवास करणाऱ्या लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली समजत नाही, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांना या खड्ड्यांमुळे प्रवासात मोठा त्रास होऊ शकतो, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दखल घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सुस्थितीत रस्ते उपलब्ध करून देणे हे विभागाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले. यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
माजिद सुभेदार आणि सलमान मेमन यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीवर्धन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. महाजन यांना हे निवेदन दिले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गणेशोत्सवादरम्यान चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.