
पंकजा मुंडेंनंतर आता शरद पवारांना धक्का; आमदाराशी जवळीक वाढली…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यापासून राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे.तिथे अजित पवारांनी एकापाठोपाठ राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर धाडसी निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे.
अजित पवार यांनी संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना तगडे पर्याय शोधण्यासाठी पावले उचलल्याचीही चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये राजाभाऊ मुंडे,बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे.अशातच आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही गळाला लावण्यासाठी अजित पवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.
पालकमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.यानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांना पाया पडून नमस्कार केला.
यानंतर अजित पवारांच्या दुसऱ्या बाजूला आमदार क्षीरसागर बसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागल्या आहेत.अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात दिवसेंदिवस जवळीकता वाढत असल्याचं बोललं जात आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असूनही आमदार संदीप क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वीच शहरात अजित पवारांचे आभार मानणार्या आशयाचे पोस्टर लावले होते.या त्यांच्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच अजित पवारांच्या 6 ते 7 ऑगस्ट रोजीच्या दोन दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावेळीही क्षीरसागर यांनी दोन्ही दिवस उपस्थिती लावली होती.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण उचलून धरताना धनजंय मुंडे यांच्याविरोधात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या खांद्याला खांदा लावून पुढाकार घेतल्याचं दिसून आलं होतं. खरंतर राष्ट्रवादी फुटीच्या अगोदर संदीप क्षीरसागर आणि धनजंय मुंडे एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते.पण अजित पवारांच्या बंडावेळी क्षीरसागर यांनी शरद पवारांची साथ दिली होती.
आता अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री स्विकारल्यापासून आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.तसेच अजित पवारही एक ना अनेक प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना तगडा पर्याय म्हणून आमदार संदीप क्षीरसागरांवर गळ टाकण्यासाठी डाव टाकण्याची शक्यता आहे.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सोबत असलेल्या राजाभाऊ-बाबरी या मुंडे पिता-पुत्रांनी पुढे पंकजा मुंडे यांनाही साथ दिली.परंतु विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ मुंडे यांनी माजलगावमधून अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे पंकजा मुंडेंसोबतचे त्यांचे संबंध बिघडले.धनंजय मुंडे-पंकजा मुंडे या बहिण भावासाठी विशेषतः पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.