
बड्या नेत्यानं सोडली एकनाथ शिंदेंची साथ !
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
याच दरम्यान पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.
मात्र आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह भाजपत प्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत शिवाजी सावंत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी शिवाजी सावंत यांनी फडणवीस यांची गुप्त भेट घेतली, या भेटीनंतर त्यांनी आज भाजपात जाणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी , युवासेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका, पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सोलापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत दिल्या घरी सुखी राहा असा उपरोधिक टोला लगावला आहे. शिवाजी सावंत आणि त्यांच्यासह भाजपात जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा हा वैयक्तीत निर्णय असल्याचं यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.