
पूर्व वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फोडल्या दारुच्या बाटल्या !
पूर्ववैमनस्यातून तिघा गुंडांनी तरुणाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दारुच्या बाटल्या फोडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. चिखली पोलिसांनी तिघा गुंडांना अटक केली आहे.
याबाबत सुरज रामदास घोडे (वय २५, रा. कल्पतरु सोसायटी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आशुतोष सुदाम कदम (वय २८, रा. संस्कार बिल्डिंग, घरकुल, चिखली), राजा युवराज हजारे (वय २८, रा. मारुली सोसायटी, घरकुल, चिखली), शैलेश शाम गायकवाड ऊर्फ बन्या (वय ३०, रा. दगडु पाटीलनगर, थेरगाव) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. ही घटना चिंचवड येथील स्पाईन रोडवरील ऑरा हॉटेलमध्ये १७ ऑगस्ट रोजी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्राबरोबर ऑरा हॉटेल येथे दारु पित बसले होते. त्यांच्या ओळखीचा आशुतोष कदम हा त्यांच्या जवळ आला. पूर्वीच्या वादाच्या रागातून तो फिर्यादीला म्हणाला, ”मी जेलमधून बाहेर आल्यापासून तुला बघतोय, तु जास्त शहाणपणा करतोयस, तुला आता जिवंत सोडत नाही़” असे म्हणून कदम याने फिर्यादीच्या कानाखाली मारली. तो बसलेल्या टेबलावरील ग्लास व दारुच्या बाटल्या उचलून फिर्यादीच्या डाव्या बाजूस डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली. तेव्हा फिर्यादीचे मित्र अविनाश धीरज, गणेश यांनी आशुतोष कदम याला पकडले. त्यावेळी राजा हजारे याने शेजारील टेबलावरील बिअरची बाटली उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. राजा हजारे व शैलेश गायकवाड यांनी टेबलावरील दारुच्या बाटल्या व ग्लास फिर्यादीस फेकून मारल्या. आम्ही इथले भाई आहोत, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, असे म्हणून दहशत माजली. पोलीस उपनिरीक्षक मासाळ तपास करीत आहेत.