
‘या’ नेत्याचे सरसंघचालकांना साकडे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने निवृत्त करावे. त्यानंतर २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची संधी हिरावलेल्या नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची संधी द्यावी, अशी मागणी करणारे खुले पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी लिहले आहे.
किशोर तिवारी म्हणाले, मी यवतमाळ जिल्ह्यात मागील ४० वर्षापासून आदिवासी व वंचित शेतकऱ्यांसाठी काम करतो. माझे वडील पंडीत जमुनाशंकर तिवारी गुरुजी संघ जनसंघाचे १९६२ पासुन पूर्णवेळ प्रचारक होते. ते १९ महीने नाशिक येथे मध्यवर्ती कारागृहात होते. मला राज्यात भाजप सरकार असतांना शेतकरी स्वावलंबन उच्चाधिकार मिशनचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीचा दर्जा दिला गेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक जुने ‘संघटन शिबिर प्रशिक्षित स्वयंसेवक असल्याने मी हे पत्र लिहित आहे.
देशाने मोदी यांना ११ वर्षे काम करण्याची संधी दिली. मोदी यांनी प्रभु रामचंद्राचे भव्य मंदिरासह अनेक चांगली कामेही केली. २०१२ मध्ये काही नेत्यांनी बोगस बिनबुडाच्या घोटाळ्याचा आरोप करणारा कट रचून नितीन गडकरी यांच्या पंतप्रधान पदाची संधी हिरावली होती. ही सर्व गोष्टी नितीन गडकरीना मी १४ डिसेंबर २०१२ ला सांगितल्या होत्या. परंतु पक्ष शिस्त अभूतपूर्व संयम यामुळे ते त्यावेळी चूप राहिले होते. आज या कटात सहभागी असलेले जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व प्रकाश जावडेकर जिवंत असून ते सत्य जगाला सांगतील व नितीन गडकरी यांची माफी मागतील, अशी मी अपेक्षा करतो. नितीन गडकरी यांची कार्यसम्राट व सर्वांना घेऊन चालणारे मंत्री म्हणून ख्याती आहे. त्यांना सर्वदूर मान्यता आहे. त्यामुळे त्यांना २०२९ च्या लोकसभा निवडणुका पूर्वी उरलेली चार वर्ष देशाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी व देशाला त्यांचे नेतृत्वात पुढे नेण्यासाठी एक सकारात्मक बदल घडवून आणावा, अशी विनंती मी आपणास करीत असल्याचेही किशोर तिवारी यांनी पत्राद्वारे मोहन भागवत यांना सांगितले.
मोदी- शहा लॉबीने मला भाजप सोडण्यास…
किशोर तिवारी यांनी पत्राद्वारे मोहन भागवत यांना सांगितले की, २०१९ मध्ये सुद्धा नितीन गडकरी यांना पंतप्रधान करण्यासाठी मी आग्रही मागणी रेटून धरली होती. परंतु त्यावेळी मोदी- शहा लॉबीने २९२ जागा मिळाल्याने मलाच भाजप सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर मी सहा वर्षे उद्धव ठाकरे यांचे सोबत होतो. मागील ११ वर्षात विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी ई. डी., सी. बी. आय., मोकाचा दुरुपयोग केंदीय निवडणूक आयोग, गुप्तचर संस्था, इतर संवैधानिक संस्था बळकावून घेतल्याचा दुदैवी संदेश सामान्य नागरिकांत जात आहे. मोदी-शहा राजवट हुकुमशाहीने वागत आहे. अशी सर्व जगात झालेली धारणा पुसून काढण्यासाठी नेतृत्व बदल आवश्यक असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.