
अमेरिकेवर केला ‘दादागिरी’चा आरोप !
अमरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंध तणावाचे बनले आहेत. यादरम्यान भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंधांमध्ये काही सुधारणा होताना पाहायला मिळत आहे.
यादरम्यान चीनचे दिल्लीतील राजदूत राजदूत झू फेहोंग यांनी गुरूवारी अमेरिका हा असा ‘दादा’ आहे, जो वेगवेगळ्या देशांकडून जास्त किमतीची मागणी करण्यासाठी टॅरिफ हे एक वाटाघाटीचे साधन म्हणून वापरत असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा चीन जोरदारपणे विरोध करतो आणि केंद्रस्थानी जागतिक व्यापर संघटना (WTO) असलेल्या बहुराष्ट्रीय व्यापार प्रणालीला सुरक्षित ठेवण्यासाठी चीन भारताबरोबर भक्कमपणे उभा राहील, असेही ते म्हणाले आहेत.
नवी दिल्ली येथील थिंक टँक्स चिंतन रिसर्च फाउंडेशन आणि सेंटर फॉर ग्लोबल इंडिया इनसाइट्स यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चीनचे राजदूत बोलत होते. एका देशाचे वर्चस्व, परदेशी मालावर कर लादून स्वदेशी उद्योगांचे संरक्षण करणे, पॉवर पॉलिटिक्स आणि दादागिरीच्या काळात चीन आणि भारत यांच्यावर पुढाकार घेऊन ‘एकसमान आणि ऑर्डरली मल्टिपोलार वर्ल्ड’ याचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे.
अमेरिकेची दादागिरी
ट्रम्प प्रशासनावर टीका करताना चीनचे राजदूत पुढे म्हणाले की, अमेरिकेने मुक्त व्यापाराचा दीर्घकाळापासून फायदा घेतला आहे, पण आता त्यांच्याकडून टॅरिफचा वापर विविध देशांकडून जास्त किंमत मिळवण्यासाठी वाटाघाटीचे साधन म्हणून होत आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादला आहे आणि आणखी लावण्याची धमकी दिली आहे. चीन याचा तीव्र विरोध करतो. अशा कृतींचा सामना करताना, गप्प राहणे किंवा तडजोड करणे फक्त दादागिरी करणाऱ्यांना बळ देते. जागतिक व्यापर संघटना केंद्रस्थानी ठेवून बहुराष्ट्रीय व्यापार प्रणाली टिकवून ठेवण्यासाठी चीन भारताच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील.
सध्या टॅरिफ वॉर आणि ट्रेड वॉर हे जागतिक अर्थव्यवस्था विस्कळीत करत आहेत आणि व्यापार प्रणाली, पॉवर पॉलिटिक्स आणि जंगलातील कायदा वापरला जात आहे आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. चीन आणि भारत सहकार्य कसे मजबूत करू शकतात आणि विकसनशिल देशांना अडचणीतून मार्ग काढण्यास मदत करण्यासाठी आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील निष्पक्षता आणि न्यायाचे पक्षण करण्यासाठी कसा पुढाकार घेऊ शकतात याबद्दल ग्लोबल साउथ गंभीर चिंतेत आहे, असे ते म्हणाले.
चीन आणि भारत यांच्या एकत्र येण्याने एकंदरीत जगाला फायदा होईल. ग्लोबल साउथचे नेतृत्व करणारे चीन आणि भारत हे दोन्ही BRICS, SCO, G20 आणि इतर बहुराष्ट्रीय यंत्रणांचे महत्वाचे सदस्य आणि जागतिक प्रशासनातील सुधारणाचे प्रणेते आहेत, असेही ते म्हणाले.