
तसंच तेलंगणा अन् आंध्रमध्ये सुदर्शन रेड्डींसाठी वातावरण !
उपराष्ट्रपती पदासाठी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.
सत्ताधाऱ्यांनी आणि इंडिया आघाडीने आता आपापल्या उमेदवाराल निवडून आणण्यासाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवरच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत ‘एनडीए’च्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
या फोनवरूनच खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्याकडे पूर्ण पाठिंबा असताना तुम्ही मते का मागताय? तुम्हाला तुमची मते फुटतील याची भीती वाटते का? असे सवाल करत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. शिवाय त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने इंडिया आगाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा दिल्याचंही स्पष्ट केलं.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही हुकूमशाही विरोधात लढण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. पण मला आर्श्चय वाटते की, बाळासाहेब ठाकरेंचा, शरद पवारांचा पक्ष तुम्ही संविधानाच्या विरोधात फोडला आणि आता देवेंद्र फडणवीस त्याच पक्षाकडे मतं मागत आहेत. हे फक्त आमच्याकडे नाही तर देशभरात मते मागत आहेत.
तुमच्याकडे पूर्ण पाठिंबा आहे तर तुम्ही मते का मागताय? तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा अधिकार आहे का? भाजपला डुप्लिकेट शिवसेनेचीही मते फुटतील असं वाटतंय का? कारण वातावरण तसं असून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक इतकी सोपी नाही. मोदींकडे केवळ कागदावर बहुमत आहे, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, राजनाथ सिंग आणि देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या अगोदर शिष्टाचार म्हणून उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली असेल. शिवाय या फोनकडे आम्ही शिष्टाचाराच्या नजेरेने बघतो. अशा निवडणुकांमध्ये या चर्चा होत असतात.
सुदर्शन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे उमेदवार असल्याने तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये अस्वस्थता आहे. प्रतिभा पाटील यांना आम्ही मराठी म्हणून पाठिंबा दिला होता. तोच प्रकार होऊ नये आणि मते फुटण्याची शक्यता असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.