दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केलायं.
यासंदर्भात आज पवार यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याबाबत उल्लेख करीत गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर असताना त्यांचं विमान इराणमधून गेलं, त्यावेळी तोच प्रकार होणार होता का? असा थेट सवाल पवार यांनी केला आहे.
पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले, कुठलंही विमान कुठेही जात असेल तर फ्लाईट प्लान द्यावा लागतो, एकनाथ शिंदे यांचं विमान दावोसला इराणमधून गेलं, त्यावेळी इराण आणि इराक दोन्ही देशांची संमती VSR ने घेतली नव्हती. त्यामुळे तुम्ही वळला नाहीत तर तुमचं विमान पाडण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. ज्यानंतर विमान इराकमार्गे वळवण्यात आलं पण तिथेही असंच सांगण्यात आलं होतं. मग बहारिनला जाऊन विमान उतरवलं गेलं तिथे तीन तास थांबल्यावर संमती मिळाली. एकनाथ शिंदेंच्याबाबतीतही तोच प्रकार घडणार होता का? यासंबंधीची माहिती डीजीसीएने प्रसिद्ध केली का? यावर एकनाथ शिंदेही बोलू शकतील असंही पवार म्हणाले आहेत.
तसेच VSR विमानांचा प्रश्न समोर आल्यानंतर अनेकांनी वेगळ्या कंपन्यांनी विमानं आणि हेलिकॉप्टर्स वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजूनही काही नेते मंडळी या कंपनीची विमानं वापरत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचं विमान दावोसला चाललं होतं. त्यावेळी VSR कंपनीने इराण आणि इराकची संमती घेतली नव्हती. आंतराराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी ही संमती आवश्यक असते. एकनाथ शिंदेंचं विमान इराण आणि इराक वरुन या कंपनीने कसं नेलं? बहारिनला त्यांचं विमान उतरवावं लागलं, त्यानंतर संमती घ्यावी लागली आणि मग त्या विमानाचं उड्डाण झालं. आणखी उशीर झाला होता तर इराणच्या लढाऊ विमानांनी ते विमान पाडलं असतं. ही माहिती आमच्याकडे आली आहे. याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेंना जाऊन तुम्ही विचारु शकता, याबाबत काही कागदपत्रं माझ्याकडे असल्याचाही दावा आमदार पवार यांनी केलायं.
दरम्यान, २८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनी आणि तपास करणाऱ्या संस्थेवर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
