राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेबाबत डीजीसीएचा अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली.
रोहित पवार यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, डीजीसीए आणि संबंधित कंपनी यांच्यातील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही लोकांच्या मते अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाली होती. याबाबत ठोस माहिती नसली तरी त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
धनंजय मुंडेंची सावध प्रतिक्रिया
या आरोपांबाबत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोण काय मांडतं, कोणाला किती अनुभव आहे, यावर मी भाष्य करणार नाही. कालपर्यंत वेगळी भूमिका आणि आज वेगळी भूमिका हा संभ्रम आहे. त्यामुळे या विषयावर बोलणं उचित नाही, असे ते म्हणाले.तसेच, विश्वास-अविश्वासाच्या गोष्टी वेळ आल्यावर स्पष्ट होतील. सत्य काय आहे ते तपासातून समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.
नितेश राणेंचा पलटवार
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी रोहित पवारांवर टीका करत, रोहित पवार आता एव्हिएशन एक्स्पर्ट झाले आहेत. तुमच्याकडे माहिती असेल तर ती अधिकृत यंत्रणेकडे द्या, असा टोला लगावला. आता फक्त पायलट बनायचं बाकी आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.
