
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला काल फोन केला. त्यांनी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे त्यांना मतदान करा अशी विनंती केली.
परंतु मी त्यांना ते शक्य नाही असं सांगितलं. कारण ते आमच्या विचाराचे नाहीत. आम्ही आमचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असं आपण त्यांना सांगितल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
त्याहीपेक्षा राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल असताना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. सोरेन यांना राजभवनात राज्यपालांच्या समोर अटक केली. सोरेन यांनी विनंती केली की मला राजभवनात अटक करु नका, दुसरीकडे कुठे करा मी येतो. पण तरीही त्यांचं न ऐकता त्यांना अटक केली. सत्तेचा चुकीचा वापर कसा केला जातो हे त्याचं उदाहण आहे असं शरद पवार म्हणाले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमची मतं कमी आहेत. पण आम्ही त्याची चिंता करत नाही आणि आम्ही नसते उद्योग करणार नाही असही पवार म्हणाले.
आम्ही सरकारचा विचार करत नाही. आम्ही निवडणुक आयोगाचा विचार करतो. गेल्या आठवड्यात वोट चोरी विरोधात ३०० खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पण तिथे आम्हाला अटक केली गेली अशी टीका पवारांनी केली. दरम्यान त्यांनी बिहार निवडणुकीबाबत देखील भाष्य केलं. म्हणाले, आज राहुल गांधीचा बिहार मध्ये मोर्चा सुरु आहे. राहुल गांधीच्या मोर्चाला बिहार मध्ये मोठा प्रतिसाद मिळतो आहे. बिहार राज्य हे आर्थिक दृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो परंतु बिहार हे राजकीय दृष्टया अत्यंत जागृत आहे असं पवार म्हणाले.
मतांच्या प्रश्नावर जे चालू आहे त्यावर निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही. मतदार यादीबाबत आमचा अभ्यास सुरू आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांकडूनही उमेदवार देण्यात आले आहेत. एनडीएकडून सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. शरद पवारांनी राधाकृष्णन यांना मतदान करता येणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.