
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं डोकं फिरल्याचं दिसत आहे. इतर देशांची प्रगती त्यांच्यासाठी पोटदुखी ठरत आहे. त्यामुळे टॅरिफ नितीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे अनेक देशांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. पण आता त्यांची रणनिती त्यांच्याच अंगाशी येत असल्याचं दिसत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर रशिया आणि चीनने भारतीय वस्तूंसाठी रेड कार्पेट अंथरलं आहे. त्यानंतर ब्रिक्स देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक दणका दिला आहे. अमेरिकेतली आयात कमी करण्याची रणनिती अवलंबली आहे. ब्रिक्समधील ब्राझीलवरही अमेरिकेने भारतासारखं 50 टक्के टॅरिफ लावला आहे. पण अमेरिकेचा हा डाव उलटा पडताना दिसत आहे. कारण आता चीन अमेरिकेऐवजी ब्राझीलकडून सोयाबीनची आयात करत असल्याचं वृत्त आहे.
चीन हा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आयात करतो. पण मागच्या काही महिन्यात चीनने अमेरिकेकडून सोयाबीनची आयात कमी केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सप्टेंबर ऑक्टोबरच्या आगाऊ खरेदीत एक टनदेखील खरेदी केली नाही. त्यामुळे अमेरिकेचे शेतकरी चिंतेत पडले आहे. चीनने आता अमेरिकेऐवजी ब्राझीलकडे सोयाबीन खरेदीचा मोर्चा वळवला आहे. जास्तीचे पैसे मोजून चीन आपली गरज भागवत आहे. चीनने जुलै महिन्यात अमेरिकेकडून 4 लाख 20 हजार 873 टन सोयाबीन आयात केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे 11.47 टक्क्यांची घट होती. मागच्या महिन्यात चीनच्या सोयाबीन आयातीत 19 टक्क्यांनी वाढ झाली. पण यात 90 टक्के वाटा हा ब्राझीलचा होता. तर अमेरिकेतून फक्त 4 टक्के आयात केली.
चीनच्या रणनितीमुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. इतकंच काय तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून भीती व्यक्त केली आहे. आमच्या सर्वात मोठ्या ग्राहकासोबतच्या टॅरिफ वादामुळे टिकू शकत नाहीत.” चीनने ब्राझीलकडून आयात सुरुच ठेवल्यास अमेरिकेतील शेतकऱ्यांचं अब्जवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ब्राझीलच्या लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेनंतर जिनपिग यांनी सांगितलं की, ब्राझीलचे कायदेशीर हक्क आणि हितसंबंध जपण्यासाठी त्याचे समर्थन करतो.