
जास्त ओढूनताणून काही…
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वादळ उठले होते. मोदी सरकारच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. राजीनामा दिल्यापासून ते एकदाही सार्वजनिक ठिकाणी दिसून आलेले नाहीत. त्यावरूनही विरोधकांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
अमित शाह यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत धनखड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या राजीनामा पत्रामध्ये आपल्या आरोग्याचे कारण दिले होते. अमित शाह यांनीही धनकड यांनी आरोग्याच्या कारणास्तवच राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले.
शाह म्हणाले, जगदीप धनखड हे एका घटनात्मक पदावर होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी घटनेला अनुरूप चांगले काम केले. त्यांनी व्यक्तिगत आरोग्याच्या समस्येमुळे राजीनामा दिला आहे. त्यावर कुणीही जास्त ओढूनताणून काही शोधण्याचा प्रयत्न करू नये, असेही शाह यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावर शहांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, धनखड यांनी 21 जुलैला सायंकाळी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत अनेक घडामोडी घडल्या होत्या. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या महाभियोगाच्या प्रस्तावावरून धनखड आणि मोदी सरकार आमनेसामने उभे ठाकल्याची चर्चा होती.
धनखड हे राज्यसभेत विरोधकांनी दिलेला महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारण्यावर ठाम होते. त्यामुळे त्यांना सरकारकडूनच राजीनामा देण्याबाबत दबाव टाकण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी त्यांनी थेट राष्ट्रपती भवन गाठत राजीनामा दिला होता. त्यानंतर सरकारकडून त्यांना निरोपही देण्यात आला नाही. त्यावरूनच विरोधकांकडून सरकारला घेरण्यात आले होते.