
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे ( इंदापूर):- चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथील बी. फार्मसी प्रथम वर्ष व डी. फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट इंदापूर क्रिटिकेअर हॉस्पिटल येथे मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना रुग्णसेवा, औषधोपचार पद्धती आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता.
या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रुग्णालयामधील विविध विभागांना भेट दिली. रुग्णालयातील ओपीडी, आयसीयू, डायलेसिस युनिट, फार्मसी विभाग तसेच बायोवेस्ट प्लांट अशा विभागांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी रुग्णालयातील प्रमुख डॉ. गोरख भोसले यांनी आयसीयूतील रुग्ण व्यवस्थापन, डायलेसिस प्रक्रियेचे महत्त्व आणि आधुनिक उपकरणे जसे की व्हेंटिलेटर्स, सेल ऍनालायझर, डिजिटल बायोकेमिस्ट्री ऍनालायझर यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून दिली.
तसेच विद्यार्थ्यांनी बायोवेस्ट प्लांटची पाहणी करून रुग्णालयातील जैविक व वैद्यकीय कचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि त्याचे विघटन कसे केले जाते हे प्रत्यक्ष अनुभवले. यामुळे त्यांना कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनाबाबत उपयुक्त ज्ञान मिळाले.
क्रिटिकेअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. ऋषिकेश गार्डे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन उपचार पद्धती, शस्त्रक्रिया, आपत्कालीन वैद्यकीय निर्णयप्रक्रिया आणि रुग्णसेवेत आवश्यक असणारे तांत्रिक कौशल्य याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी रुग्णसेवेत प्राविण्य मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नैतिकता, काळजी व संयम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के, प्रा. किरण सातपुते, प्रा. नम्रता मोरे,चिन्मय देशपांडे,दत्ता कडावळे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन दिल्याबद्दल हॉस्पिटल प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचारी वर्गाचे आभार मानले.
विद्यार्थ्यांनी या भेटीतून रुग्णसेवा, औषधोपचार पद्धती, वैद्यकीय उपकरणांचा वापर आणि बायोवेस्ट प्लांटच्या कार्यपद्धतीबद्दल सखोल व व्यावहारिक ज्ञान आत्मसात केले. त्यामुळे त्यांना भविष्यात औषधनिर्मिती, फार्मसी अभ्यास आणि रुग्णसेवा क्षेत्रात उपयुक्त कौशल्य विकसित करण्यास निश्चितच मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट या प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रक्रियेचा समग्र आढावा मिळाला व रुग्णसेवेत तंत्रज्ञान आणि कौशल्य याबाबत सखोल समज प्राप्त झाली. या शैक्षणिक रुग्णालय भेटीसाठी महाविद्यालयातर्फे आभार प्रदर्शन प्रा. किरण सातपुते व्यक्त केले.
या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.