
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवि राठोड
पालघर :लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या “वोट चोरी विरोधातील आंदोलनाला” समर्थन देत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, पालघर तालुका काँग्रेसतर्फे भव्य सह्या मोहीम राबविण्यात आली.
सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत पालघर रेल्वे स्टेशनसमोर झालेल्या या मोहिमेला काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेची सुरुवात करण्यात आली. बॅनरवर पहिली स्वाक्षरी करून अधिकारी यांनी या आंदोलनाची जोरदार सुरुवात केली.
या मोहिमेदरम्यान “वोट चोर, गद्दी सोड” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांची गर्दी आणि विरोधी पक्षाच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद यामुळे स्टेशन परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांना संबोधित करताना तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश अधिकारी म्हणाले, “राहुल गांधी यांनी सुरू केलेले हे आंदोलन गावोगावी, खेडोपाडी पोहोचवले जाईल. लोकशाहीच्या पवित्र मताधिकाराची पायमल्ली करून मतांची चोरी करणारे हे सरकार बेकायदेशीर आहे. संविधानाने दिलेला ‘एक व्यक्ती, एक मत’ हा अधिकार मोदी सरकारने हिरावून घेतला आहे. न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील.”
या सह्या मोहिमेत शहर काँग्रेस अध्यक्ष मनोहर दांडेकर, नरोत्तम पाटील, किरण पाटील, रोशन पाटील, आसिफ मेमन, मनोज दांडेकर, मनोज पाटील, शैला प्रसाद, सलीम पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांचाही उल्लेखनीय सहभाग लाभल्याने काँग्रेसला स्थानिक पातळीवर उर्जितावस्था मिळाल्याचे चित्र दिसून आले.