
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनिधी -रवि राठोड
पालघर : (विरार) – वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीत बाधित नागरिकांच्या मूलभूत गरजा तातडीने पूर्ण करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बोईसर विधानसभा (शिंदे गट) आमदार विलास तरे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण झाला आहे. अपघातांचा धोका वाढत असून शाळकरी मुले, रुग्ण व नोकरदार वर्गाला प्रवास करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे जलवाहिन्या तुटणे, गळती होणे आणि गाळ साचणे यामुळे अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना स्वच्छ पाण्याच्या टंचाईचा आणि अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. नाले व गटारे वेळेत न साफ झाल्याने अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले असून घरगुती वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यातून डासांचा प्रादुर्भाव वाढून साथरोगाचा धोका निर्माण झाला आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार तरे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, मुख्य व गौण रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी. वाहतूक शाखेसह समन्वय साधून अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करावी. तुटलेल्या पाइपलाईनची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा. नाले व गटारे तातडीने साफ करून पाणी निचऱ्याची व्यवस्था सुनिश्चित करावी. बाधित भागात आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांना वैद्यकीय मदत व आवश्यक औषधे पुरवावीत तसेच परिवहन सेवा सुरळीत ठेवावी.
वसई-विरार शहरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वसलेली असल्याने या समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहेत. नागरिकांच्या जीवनमानावर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून बाधितांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी आमदार विलास तरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.