
शरद पवार; उद्धव ठाकरेंचं नाव घेत घणाघाती टीका…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाजबांधवांचा महामोर्चा 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाला होता.
आज, 29 ऑगस्ट रोजी सकाळी, मनोज जरांगे आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होताच भाजपकडून (BJP) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल करण्यात आलाय.
भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष. मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मोर्चा’ म्हणून हेटाळणी करणारे सामना. आरक्षणचे विषय आता नको म्हणणारे शरद पवार आणि वर्षानुवर्षे मराठा समाज केवळ मतपेढी म्हणून पाहणारा काँग्रेस पक्ष. आजही हे तिघेही केवळ राजकारण करू पहात आहेत. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मनोज जरांगे यांच्या मागणीवर हे तिघेही मूग गिळून गप्प आहेत.
मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका करावी, पण…
आता या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. याबाबत कायदेशीर बाबी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका करावी, लोकशाहीतील तो अधिकारच आहे. पण आता शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस पक्षाकडे त्यांच्या मागणीबाबत स्पष्टता मागायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्रजी यांचे सरकार सर्वाधिक संवेदनशील
केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, कारण सर्वाधिक संवेदनशील हे देवेंद्रजी यांचे सरकार आहे व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा देवेंद्रजी यांनी घेतला, आताही अशा वेळी त्यांच्या नावाने टीका करून काय साध्य करीत आहोत?
▪️मराठा समाजाला १० टक्के आरक्षण महायुती सरकार असतानाच मिळाले व सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला रद्द केले नाही.
▪️शिंदे समितीस मुदतवाढ मिळावी ही त्यांची मागणी होती, त्याला सहा महिने मुदत वाढ दिली.
▪️मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना नोकरी मिळावी, अशी मागणी होती ती सुध्दा जवळपास पूर्ण झाली.
▪️ अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून मराठा समाजातील एक लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी, 8320 कोटींचे कर्ज वाटप केले.
▪️राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून मराठा समाजातील 17.54 लाख विद्यार्थ्यांना 9262 कोटी दिले.
या तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा
मराठा समाजाला न्याय देणारे देवेंद्रजी व या उलट कोणतीही भूमिका न घेणारे काँग्रेस, उबाठा, शरद पवार… महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाशी द्रोह करणारे हे या तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा, असा हल्लाबोल त्यांनी मविआवर केलाय.