
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आश्वासन देत म्हणाले..
मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनप्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतील झोन एकच्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये मराठा आंदोलकांविरोधात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यापैकी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दोन, जे. जे. मार्ग, कुलाबा, एमआरए मार्ग व डोंगरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बेकायदेशीर कृत्य करणे, रस्ता अडवणे यासह वेगवेगळ्या कारणांसाठी अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आंदोलन काळातील राजकीय गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
गेल्या पाच दिवसांमध्ये मराठा आरक्षणासाठी मुंबईत करण्यात आलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेला अडथळा आणि रस्ता रोकोसह सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा आणल्याच्या आरोपांवरून मुंबई पोलिसांनी तब्बल नऊ गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे सोमवारी (१ सप्टेंबर) नोंदवण्यात आले असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, आता हे गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं की “आम्ही आंदोलन काळातील सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार आहोत.
अद्याप कोणालाही अटक केलेली नाही
दरम्यान, दाखल गुन्ह्यांबाबत पोलिसांनी सांगितलं की “हे गुन्हे बेकायदेशीर जमाव जमवणे आणि रस्ता रोकोसारख्या कलमांखाली नोंदवण्यात आले आहेत.” आंदोलकांनी जबरदस्तीने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. जे नऊ गुन्हे दाखल झाले आहेत त्या प्रकरणांमध्ये सहभागी आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र संबंधित कलमांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बऱ्याचदा राजकीय आंदोलनांतील गुन्हे काही दिवसांनी अथवा महिन्यांनी मागे घेतले जातात. त्यामुळे पोलीस लगेच अटक करत नाहीत. या प्रकरणातही तशीच स्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राजकीय गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये आंदोलकांनी वाहतूक ठप्प करणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन करणे यासंबंधी तक्रारी होत्या.