
मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा !
मनोज जरांगेंच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या मागण्या मान्य करत सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील काढला. यामुळे ओबीसी समाज नाराज झाला असून ते कोर्टात जाणार आहेत. यासंदर्भात ओबीसी नेत्यांची बैठक देखील झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण उपसमिती स्थापन करण्यास मान्यता दिली. यावरून आता मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. याचवेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांसह छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘कुणी कितीही उपसमित्या बनवल्या तरीही आरक्षण मिळवणारच. मी माझ्या समजााला आरक्षण मिळवून देणारच. आम्ही काहीच टेन्शन घेत नाही. ओबीसीमध्ये मराठ्यांना मीच घालणार आणि आरक्षण मीच देणार आहे. कुणी कितीही काही बोलले तरी आरक्षण मिळवूनच देणार. कितीही काय झालं तरी त्याचा आम्हाला फरक पडत नाही.
ओबीसी समाजासाठी उपसमिती तयार केल्यावरून देखील जरांगेंनी टीका केली. ते म्हणाले की, ‘ओबीसी समाजासाठी उपसमिती गठित केली तर आणखी एक काम करा. दलित मुस्लिमांसाठी उपसमिती करा, एक उपसमिती शेतकऱ्यासाठी, आदिवसांसाठी एक आणि मायक्रो ओबीसीसाठी एक उपसमिती स्थापन करा. माझा विषय आरक्षण आहे. मी त्याच्यावर तुटून पडलो आहे. कुणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी मी आणि माझा समाज कुणावरही विश्वास ठेवत नाही.
मनोज जरांगे यांनी जीआर निघाल्यानंतर नाराज झालेल्या छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘भुजबळ पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचे अस्तित्व संपवणारा माणूस आहे. बैठकांना बोलावल्यावर येणार नाही आणि नंतर कुरापत्या करायच्या. जीआर बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत. संभ्रम निर्माण करणारे फक्त टीव्हीवर असतात.’ तसंच, ‘मराठवाड्यातला सर्व मराठ्यांना मी आरक्षणामध्ये घालणार. जर आरक्षण मिळाले नाही तर मी रस्त्यावर फिरून देणार नाही. मी आरक्षण मिळवून देण्यासाठी सक्षम आहे. थोडा दम धरा, आरक्षण मिळवूनच देतो. सातारा गॅझेटमध्ये सरकारने हयगत करता कामा नये.’, असं देखील जरांगे म्हणाले.