
एक वर्षानंतर भाच्याचा वाजवला ‘गेम’…
पुण्यात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकलं आहे. गेल्या वर्षी ज्या निर्घृणपणे वनराज आंदेकरला संपवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्याच हत्येच्या बदल्यासाठी आंदेकर टोळीकडून मोठी तयारी सुरू होती.
अखेर आंदेकर टोळीनं वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला एका वर्षानं गोविंदा कोमकर याच्या हत्या करत घेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक राहिलेल्या वनराज आंदेकरची गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 ला नाना पेठेत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्याच्याच हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं गोविंदा कोमकरचा गेम वाजवल्याचं बोललं जात आहे.
आंदेकर टोळीकडून रेकी, ट्रॅपद्वारे वनराजची हत्या केलेल्या आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांवर पाळत ठेवण्यात येत असल्याची कुणकुण होती. यातूनच वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या सोमनाथ गायकवाडच्या मुलाच्या हत्येसाठी कात्रज भागात मोठा प्लॅनही रचण्यात आला होता. पण पुणे पोलिसांनी याच कटातील एकाला ऐनवेळी उचलल्यानं आंदेकर टोळीचा कट फसला.
पुण्यातील नानापेठेत शुक्रवारी(ता.5) हत्या झालेल्या गोविंदा कोमकर आणि वनराज आंदेकर हे सख्खे मामा – भाचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वनराज आंदेकरच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या संजीवनी कोमकरचा गोविंदा हा पुतण्या तर गणेश कोमकरचा मुलगा आहे. पण काही दिवसांपूर्वीच कट उधळल्यानंतर आंदेकर टोळीनं गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस व्यस्त असल्याची संधी साधत गोविंदा कोमकरची विकेट काढली.
वनराज आंदेकरची हत्या झालेल्या स्पॉटपासून अगदी जवळच गोविंदा कोमकरला ृ तीन गोळ्या झाडून संपवण्यात आलं आहे. मामाच्या हत्येचा बदला, भाच्याची हत्या करुन घेतल्याची चर्चा आहे. पण गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच पुण्यात गँगवॉर भडकल्यानं खळबळ उडाली आहे. त्याचसोबत पोलिसांचं टेन्शन वाढलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुण्यात कुख्यात बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात टोळीयुद्ध भडकलं आहे. आंदेकर टोळीनं शुभम दहिभाते व निखील आखाडेवर 2023 मध्ये प्राणघातक हल्ला केला होता. त्यात निखीलचा मृत्यू झाल्यानंतर गायकवाड टोळीनं याचा बदला घेण्यासाठी दबा धरुन होती.
याच हत्येचा बदला म्हणून बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरचा 1 सप्टेंबर 2024 रोजी डोके तालीम भागात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या हत्येनं पुण्यात पुन्हा गँगवॉर भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
वनराज आंदेकरच्या हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा ‘गेम’ उडणार अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू झाली होती.अखेर वर्ष पूर्ण झाल्यानंतर गोविंदा कोमकरची हत्या झाली आहे. वनराज आंदेकर हत्येत प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाडसह जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. ते तुरुंगात असले, तरी त्यांचा बदला घेण्याचा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारण सध्या शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही ही घटना घडली आहे. हल्लेखोरांनी नाना पेठेत गोविंद कोमकरवर गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. या गोळीबाराच्या घटनेत गोविंदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली असून या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासकार्य सुरु केलं आहे.