
फडणवीसांच्या आमदाराचा स्पष्ट संदेश…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत असलेली पानभर जाहिरात शनिवारी राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.
या जाहिरातीमध्ये ‘देवाभाऊ’ येवढाच उल्लेख होता. वर्तमानपत्रासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात देखील ठिकठिकाणी ही ‘देवाभाऊ’चे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली असल्याची चर्चा आहे.
जाहिरातीमध्ये तसेच बॅनरवर कोणताही मजकूर नसल्याने ही जाहिरात नेमकी कशाच्या संदर्भात आहे हे स्पष्ट होत नाही. मात्र, नुकताच मराठा आंदोलन यशस्वीपणे हाताळत हैद्राबाद गॅझेट संदर्भात जीआर काढण्यात आला. त्यामुळे याचे श्रेय घेण्यासाठी ही जाहिरातबाजी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ठाण्यात बॅनर लावून एकनाथ शिंदेंना डिवचण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे.
दरम्यान, या बॅनरबाजीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. ओबीसी असेल, मराठा समाज असेल दोघांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. आता देवेंद्रजी आणि आम्ही एकाच टीम म्हणून काम सुरू केलं आहे. यापुढे असंच वेगाने काम करणार आहोत. गोरगरिबांचा विकास हाच एक आमचा अजेंडा आहे.
छत्रपतींच्या विचारांचा वारसदार…
चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी ठाण्यात बॅनर लावत ‘देवाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसदार’, असे म्हटले आहे. बॅनरवरील मजकुरात म्हटले आहे की, ना जातीचा नापातीचा नाभाषेचा देवभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचा. कोणीही निंदा करो, टीका करो तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच देवेंद्र फडणवीससाहेब. या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे देखील फोटो लावण्यात आले आहेत.