
ठाकरेंचा ग्रीन सिग्नल…
राज्यातील विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर येत्या काळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विधानसभा निवडणुका होऊन दहा महिने झाले.
त्यावेळेसपासून विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने हे पद रिक्त आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत 31 ऑगस्टला संपली आहे. त्यामुळे आता हे पद रिक्त झाले आहे. त्यातच आता या दोन्ही पदासाठी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या या पदावर काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षात कोण माघार घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर दुसरीकडे आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या रिक्त झालेल्या पदावर काँग्रेसने दावा केला आहे.
त्यामुळेच सोमवारी काँग्रेसचे (Congress) नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमीन पटेल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेतेमंडळी मातोश्रीवर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करण्यात आला आहे.
विधान परिषदेतील संख्याबळ पाहता आता काँग्रेसचे संख्याबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे या पदावर काँग्रेसने दावा केला आहे. या पदासाठी त्यांच्याकडे माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा असून त्यामुळे या पदावर काँग्रेसने दावा केला असल्याचे समजते. या भेटीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना व काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर आता विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आता या पदासाठी आमदार सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर असून त्यांना लवकरच लाल दिवा मिळणार असल्याची चर्चा शिगेला पोहचली आहे. त्यातच सतेज पाटलांच्या नावाला उद्धव ठाकरे यांचा ग्रीन सिग्नल असल्याने त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.