
राज्यातील जलसंपदा सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण तत्कालीन सिंचन विभागाचे अधिकारी आणि सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्याविरोधातील जलसंपदा सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.
तसेच अजित पवारांवर निशाणा साधताना विजय पांढरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष केलं आहे.
विजय पांढरे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करताना म्हटले की, अजित पवार हे सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार होते. त्याप्रकरणी अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेसने अजित पवार यांची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सरकार पाडण्यात आले. यानंतर जलसिंचन खात्यातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली होती. पण त्या समितीने अहवालात गोष्टी होत्या तशा नीटपणे मांडल्या नाहीत. मात्र माधवराव चितळे समितीने जलसिंचन घोटाळ्याच्या अहवालात भ्रष्टाचाराबाबत पुरेशा गोष्टी नमदू केल्या होत्या, असा दावा त्यांनी केला.
विजय पांढरे म्हणाले की, माधवराव चितळे यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, याप्रकरणात चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे. मात्र, सरकारने चितळे समितीचा अहवाल लपवून ठेवला. तसेच चितळे यांनी म्हटले होते की, मी दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली तर अजित पवार जेलमध्ये जातील. मात्र, अजित पवारांचे जलसिंचन घोटाळ्याचे काम लपवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, यामध्ये शंका नाही. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीनचिट देण्याचे काम केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पाठीशी घातले, असा खळबळजनक दावा विजय पांढरे यांनी केला आहे.
विजय पांढरे म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीनचिट दिल्याची लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली आहे. मात्र, अद्याप नागपूर खंडपीठाने ती क्लीनचिट मान्य केलेली नाही. त्यामुळे सध्या या प्रकरणाची सुनावणी होत नाही, ही खरी अडचण असल्याचेही विजय पांढरे यांनी म्हटले आहे.