
तायवडे घेणार फडणवीस-सावेंची भेट…
सरकारने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 2 सप्टेंबर रोजी आदेश आदेश सुपूर्द केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या आणि साखळी उपोषणाला बसलेल्या नागपूरमधील ओबीसी आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या होत्या.
या मागण्यांचा शासन आदेश (GR) आज काढणार का, याकडे ओबीसींचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे आणि संघटनेचे इतर पदाधिकारी आज (9 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांची भेट घेणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळावे, यासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईत बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर सरकारने ओबीसींवर अन्याय करू नये, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये आंदोलन सुरू केले होते. जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी जीआर मिळाल्यानंतर उपोषण सोडले. त्यानंतर ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी नागपुरात जाऊन ओबीसी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य केल्या. या मागण्या मान्य केल्या असल्या तरी त्यांचा शासन आदेश अजून निघालेला नाही. या पार्श्वभूमिवर अतुल सावे यांनी आज ओबीसी नेत्यांसोबत बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी बबनराव तायवडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या मात्र, त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी नागपूरमधील संविधान चौकात ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र, मंत्री अतुल सावे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी साखळी उपोषण मागे घेतले आहे. नागपूरमधील संविधान चौकात सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. आता हेच आंदोलक मंत्री अतुल सावे यांना भेटणार आहे. या भेटीत मान्य केलेल्या 12 मागण्याचे सरकार शासन आदेश काढणार का, याचे उत्तर लवकरच मिळेल.