
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांचा मृतदेह सोलापुरात कारमध्ये आढळून आला. त्यांच्या डोक्यात गोळी लागलेली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र पोलीस तपासात प्रेमप्रकरण, ब्लॅकमेलिंग आणि मालमत्तेवरील डोळा यामुळे प्रकरणाला थरारक वळण मिळालं आहे.
लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांनी नर्तिकेच्या प्रेमाच्या नादात लाखो रूपयांची उधळण केली होती. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. माजी उपसरपंचाच्या बंगल्यावर नर्तिकेचा डोळा असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की प्रकरण काय?
बीडच्या गेवराईतील लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापुरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. एका कला केंद्रातील नर्तिकेसोबत माजी उपसरपंचाचे प्रेमसूत जुळले होते. यादरम्यान, गोविंद यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह लाख रूपयांचा मोबाईल तिला भेट म्हणून दिली होती.
नर्तिकेकडून हळूहळू मागणी वाढू लागली. तिनं काही दिवसानंतर उपसरपंचाकडे आलिशान घराची मागणी केली होती. गोविंद बर्गे यांनी वर्षभरापूर्वी घर खरेदी केली होती. गेवराईच्या माधव नगर भागात त्यांचा आलिशान बंगला होता. दहा दिवसांपूर्वीच घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यानंतर कुटुंबिय त्या घरात राहायला येणार होते, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली होती. मात्र, याच घराची मागणी नर्तिका करत होती, अशी माहिती आहे.
आता या प्रकरणात नर्तिकेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुजा गायकवाड असं आरोपीचं नाव असून, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाने पुजाला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित महिलेनं गोविंद यांना, ‘गावाकडील घर नावावर कर, बार्शीत शेतजामीन घेऊन दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन’, अशी धमकी दिली होती. त्या महिलेविरोधात नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.