
तातडीची बैठक…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपलं वक्तव्य वारंवार बदलत असतात, ते कधीही आपल्या एका मतावर ठाम नसल्याचं दिसून येतं. ते कधी कोणता निर्णय घेतील हे कोणीही सांगू शकत नाही.
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, तर दुसरीकडे ते भारताला आपला चांगला मित्र देखील मानतात. सुरुवातीपासूनच अमेरिकेची ही रणनीती राहिलेली आहे, आणि या रणनीतीचा आतापर्यंत अनेक देशांना फटका बसला आहे.
आता अमेरिका असं काही करण्याच्या तयारीमध्ये आहे, ज्यामुळे भारताला मोठा धक्का बसू शकतो. फायनांशियल टाइम्सच्या एका रिपोर्टसनुसार अमेरिकेनं G7 देशांना भारत आणि चीनवर 100 टक्के टॅरीफ लावण्यास सांगितलं आहे. यापूर्वी युरोपीयन यूनियनचे सदस्य असलेल्या देशांनी देखील भारत आणी चीनवर टॅरीफ लावावा यासाठी त्यांनी या देशांवर दबाव आणला होता.
आज G7 देशांच्या अर्थमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सवर एक बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे युक्रेन आणि रशियामध्ये युद्धविराम घडून आणण्यासाठीच्या प्रयत्नावर चर्चा होणार आहे. तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी अमेरिकेनं तयार केलेल्या प्रस्तावावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते जी 7 देशांनी भारत आणि चीनवर टॅरीफ लावावा यासाठी अमेरिकेकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण केला जाण्याची शक्यता आहे.
जर जी 7 देशांनी, ज्यामध्ये अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि ब्रिटन या देशांचा समावेश आहे, यांनी जर भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा फटका हा भारताला बसू शकतो. अमेरिकेनं या देशांपुढे भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव ठेवा आहे, मात्र अजून किती टॅरीफ लावला जाणार, याबाबत माहिती समोर आलेली नाहीये.
मात्र आधीच अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसू लागला आहे, आता जर अमेरिकेच्या दबावाला बळी पडून जी 7 देशांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा फटका हा देशाला बसू शकतो.