
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक नेते लढत आहेत तेव्हा आरक्षणाच्या प्रश्रासंदर्भात कोणत्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये आत्महत्यासारख्या घटनेचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी वांगदरी येथे बोलताना केले.
रेणापूर तालुक्यातील मौजे वांगदरी येथील भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसीचे आरक्षण संपत आल्याच्या भीतीने मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली सदर घटना समजल्याने आमदार कराड यांनी शुक्रवारी सकाळी वांगदरी येथे जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला. या प्रसंगी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी कृषिमंत्री आ धनंजय मुंडे यांनीही कराड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी मयत भरत यांचे वडील महादेव कराड, आई गिरिजाबाई, पत्नी, भाऊ आणि मुले होते. याप्रसंगी वांगदरी आणि परिसरातील ओबीसी बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांतून अमर रहे अमर रहे भरत कराड अमर रहे, एकच पर्व ओबीसी सर्व, न्याय न्याय द्या ओबीसींना न्याय द्या अशा घो षणा देण्यात येत होत्या. उपस्थितांशी संवाद साधताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात शासनाच्या जीआरनंतर ओबीसी समाजात संताप व्यक्त होत असून आरक्षण संपल्याच्या भीतीने अत्यंत गरीब कुटुंबातील ऑटोचालक भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली.
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजातील अनेक ज्येष्ठ नेते लढत आहेत. त्यामुळे आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल कोणत्याही तरुणांनी उचलू नये शासन आपल्या सोबत आहे. मयत भरत कराड यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेत असल्याचे यावेळी आ. कराड यांनी बोलून दाखवले.
यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, ओबीसी समाजाचे नवनाथ वाघमारे, भागवत सोट, सतीश आंबेकर, विजय गंभीरे, मनोज कराड, विजय काळे, नागनाथ कराड, बाबासाहेब घुले, बालासाहेब शेप, अभिषेक आकनगिरे, अनिल गोयकर, सुभाष राऊत, दत्ता शेप, गणेश केंद्रे, संजय गंभीरे, प्रमोद भांगे, शे-षराव कराड, जयद्रथ कराड, संजय डोंगरे राजाभाऊ हाके पाटील, बंडू मुंडे, विनोद आंबेकर रमेश लहाडे, नरेश चपटे, दत्ता सरवदे, अनुसया फड, राम भताने, लक्ष्मण खलंग्रे राजू जटाळ, पिंटू डोंगरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.