
बीडमधून मोठी बातमी…
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला, या जीआरला ओबीसी समाजाकडून प्रचंड विरोध होत आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, स्वतंत्र्य आरक्षण द्या, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. त्यामुळे या जीआरनंतर पुन्हा एकदा ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्ष नको अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर हाके यांनी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे सभेचं आयोजन केले होते, या सभेत बोलताना त्यांनी मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, या वक्तव्यानंतर हाके यांच्याविरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून, त्यांना इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान हाके यांना हे वादग्रस्त वक्तव्य आता चांगलंच भोवलं आहे. मराठा समाजातील मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
दरम्यान दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आतापर्यंत त्याच्यावर काही बोललो नाही, तुम्हाला आतापर्यंत बोललो नाही, लक्षात ठेवा, तुमच्या लेकीबाळी मी माझ्या लेकीबाळी प्रमाणे समजतो. अजित पवारांचे दोन कार्यकर्ते भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना बोलता येत नसल्यानं त्यांनी हाकेला हाताखाली धरलं आहे, हाके हे भुजबळ आणि मुंडे यांची भाषा बोलत असल्याचा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे. ते स्वत: हातानं वाद ओढून घेतात, हे आता धनगर समाजाला देखील कळालं आहे, त्यामुळे ते देखील त्यांना जवळ उभे करत नाहीत, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं.