
पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याने संतापला…
भारताने आशिया चषकात पाकिस्तानवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने सुरूवातीपासूनच सामन्यावर आपली पकड कायम ठेवली आणि पाकिस्तानला पुनरागमनाची एकदाही संधी दिली नाही.
सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि त्यांनी पाकिस्तानशी हस्तांदोलन केलं नाही. यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे.
पाकिस्तानशी भारताने हस्तांदोलन न केल्याने हा खूप चर्चेचा विषय बनला आहे आणि आता माजी पाकिस्तानी कर्णधार रशीद लतीफने आपल्या संघाच्या जाहीर अपमानावर आपलं मौन सोडलं आणि म्हटलं हस्तांदोलन न करण्याचा कलंक नेहमीच राहील.
पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ म्हणाले, “याआधीही युद्ध झाली आहेत पण आपण नेहमीच खेळाडूंनी हस्तांदोलन केलं आहे. या गोष्टीचा आयुष्यभरासाठी कलंक राहील. सुनील गावस्करांनी त्यांच्या मुलाखतीत जावेद मियांदादचा उल्लेख केला. पण त्यांनी कधी हात मिळवण्यास नकार दिला नाही. आपण आपआपल्या संघाचं प्रतिनिधीत्त्व करतो. पण हे मैदानावर जे घडलं ते चुकीचं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल तुमचे स्वतःचे मत असायला हरकत नाही पण जेव्हा तुम्ही मैदानावर याल तेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने खेळलं पाहिजे. जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असेल तर जबाबदार असलेल्यांना रकडा. भारताने युद्ध लढायला हवं होतं, तेही त्यांनी अर्धवट सोडलं. पण मैदानावर जे झालं ते बरोबर नव्हतं”, असं रशीद लतिफ म्हणाले. टीम इंडियाने आपली चुकीची छाप पाडल्याचं म्हटलं आहे.
सामन्यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनीही वक्तव्य केलं आणि त्यांनी सांगितलं की, सामन्यानंतर संघातील खेळाडू भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करू इच्छित होते परंतु तसं झालं नाही. हेसनला देखील हे वागणं आवडलं नसल्याचं त्याने म्हटलं. पाकिस्तानचा कर्णधारदेखील सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सहभागी झाला नाही. त्याने मुलाखत न देण्याचा निर्णय घेतला होता, ही माहितीदेखील प्रशिक्षकांनी दिली आहे.
शोएब अख्तर भारत पाकिस्तानमधील हँडशेक वादावर काय म्हणाला?
पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने देखील हस्तांदोलन वादावर वक्तव्य केलं. शोएब अख्तर म्हणाला, सामन्याला राजकारणाचं वळण देऊ नका. भारताचं कौतुक की ते खूप छान खेळले. आम्हीदेखील तुमच्याबद्दल चांगलं बोलतोय. हस्तांदोलन करायला हवं होतं. भांडणं होतात, वाद होतात, पण हे प्रकरण वेगळ्या स्तरावर नेण्याची गरज नाही.