
तर आम्हीही…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनेकडून सध्या कोकणात पक्षसंघटनात्मक बांधणीच्या पातळीवर जोरात काम सुरू आहे, त्याची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ती मोहीम हाती घेतली असून मित्रपक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर आम्ही एकटे लढू, अशी घोषणा कदम यांनी केली आहे.
शिवसेना पक्ष बांधणीच्या दृष्टीने राज्यमंत्री योगेश कदम (yogesh Kadam) यांनी आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्याचा प्रारंभ त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केली आहे. सिंधुदुर्गमधून बोलतानाच त्यांनी मित्रपक्षाने स्वळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर आम्ही एकटे लढू, अशी भूमिका मांडली आहे
योगेश कदम म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी माझ्याकडे जी जबाबदारी दिली आहे, त्यामध्ये महत्वाची खाती माझ्याकडे आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांशी निगडित असलेले प्रश्न या खात्यांच्या माध्यमातून सोडवू शकतो. शिवसेना पक्षसंघटनेने ठरवल्याप्रमाणे आम्ही कोकणाचा (konkan) दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरू केला आहे.
या कोकण दौऱ्यात मी ग्रामविकास, महसूल, अन्न व प्रशासन विभाग आणि अन्न व नागरी पुरवठा या चारही खात्यांचा आढावा स्वतः घेणार आहे. या आढावा बैठकीसोबतच माझ्याकडे असलेल्या खात्याची, प्रशासनाची आणि सरकारची ताकद शिवसेना पक्षाच्या पाठीशी उभे करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आम्ही आमच्या लहानपणापासूनच अविरतपणे केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला, त्यावेळी शिवसेना बकळट करण्यासाठी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे. आमच्याकडून ते काम व्हावं, अशी शिंदे यांनाही अपेक्षा आहे आणि ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. त्यानंतर तातडीने तुमचा जिल्ह्याचा दौरा होत आहे. त्यादृष्टीने तुम्ही शिवसेनेची बांधणी कशी पद्धतीने करणार आहात, या प्रश्नावर कदम म्हणाले, निवडणुका होतच असतात. निवडणूक ही कायम चालणारी प्रक्रिया आहे. पण, संघटनात्मक बांधणी हा आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांना अपेक्षित असणारे काम आम्ही करत आहोत, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, भाजपकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. त्यावर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे. यावर कदम म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढायचे की महायुती करून याबाबतचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. शेवटी वरिष्ठांचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.
महायुती म्हणून निवडणूक लढायचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला, तर आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू. समजा महायुती झाली नाही तर आम्हीही एकटे लढू, अशी घोषणही योगेश कदम यांनी करून टाकली आहे.