
पालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या जुहू गल्लीतील घरांचा प्रकल्प एसआरएत घुसवला…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक आणि भाजपचे सदस्य मोहित कंबोज आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यात मुंबईतील एसआरए प्रकल्पांवरून चांगलीच जुंपली आहे.
मोहित कंबोज यांना एक-दोन नव्हे, तर चक्क 30 एसएआरए प्रकल्प कसे मिळाले? असा प्रश्न उपस्थित करत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर दुसरीकडे, मला मिळालेल्या 30 प्रकल्पांपैकी किमान 5 प्रकल्पांची यादी वर्षा गायकवाड यांनी द्यावी आणि माझ्यावरचे आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान मोहित कंबोज यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाडांना दिले आहे.
वर्षा गायकवाड यांनी सोमवारी जुहू गल्लीतील एसआरए प्रकल्प हा मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजनेअंतर्गत प्रकल्प होता. मात्र तो बदलून एसआरए दाखवल्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत रहिवाशांसह एसआरएचे सीईओ डॉ. महेंद्र कल्याणकर यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड यांनी मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत मोहित कंबोज यांच्या नावे एसआरएचे 30 प्रकल्प मिळाले हे खरे आहे का? अशी विचारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत केली. तर एसआरएने तात्काळ खुलासा करावा की मोहित कंबोज यांच्या कंपनीला किती प्रोजेक्ट मिळाले आहेत, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत उपस्थित केला आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीसुद्धा भाजपमधील मराठी माणसाने फक्त सतरंज्या उचलायच्या आणि मलिदा मात्र उपर्या कंबोजला मिळणार, असा उपराधिक टोला लगावला.
माजी शिक्षण मंत्री, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी एसआरएचे सीईओ डॉ. महेंद्र कल्याणकर यांची सोमवारी एसआरए कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान वर्षा गायकवाड यांनी जुहू येथील स्थानिकांसमवेत एसआरए प्रकल्पात सुरू असलेल्या अनियमिततेबाबतची माहिती डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिली. मुळात मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचार्यांना आश्रय योजनेंतर्गत घरे बांधण्यात येणाऱ्या जुहू गल्लीतील तब्बल 38 एकरच्या एसआरए प्रकल्पासाठी (सर्वधर्मीय एसआरए सीएचएस आणि इतर 36 सीएचएस योजना) शिव इन्फ्रा व्हिजन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडची विकासक म्हणून नेमणूक कोणत्या आधारावर केली? यावेळी कोणत्या प्रक्रियेचे पालन केले? असा सवाल त्यांनी केला. एसआरए प्रकल्प नसताना एसआरएत आश्रय योजना कुणी घुसवली या सर्व प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी.
या कंपनीचा भाजप नेत्याशी काय संबंध आहे? विकासक बदलण्यापूर्वी महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यांतर्गत अनिवार्य 13(2) प्रक्रिया पूर्ण झाली होती का? या नियुक्तीला बहुतेक बाधित एसआरए सोसायटींनी आक्षेप घेतला नव्हता का? असा प्रश्नांचा भडिमार केला. त्या म्हणाल्या की, गरिबांच्या घरांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी तयार केलेले एसआरए आज भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहे. ते बांधकाम व्यावसायिक आणि सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये राजकीय प्रभाव असलेल्यांची निर्लज्जपणे बाजू घेत आहेत. हजारो कोटी रुपयांच्या जुहू गल्ली प्रकल्पात साडेसहा हजारांहून अधिक झोपडपट्टीवासीयांचा समावेश आहे. त्यांपैकी जवळजवळ सर्वांनाच या प्रकल्पात नवीन विकासक लादण्यापूर्वी अंधारात ठेवण्यात आले होते. त्यांच्याशी सल्लामसलत का करण्यात आली नाही? हे त्यांच्या हक्कांचे आणि एसआरए नियमांच्या मूळ भावनेचे उल्लंघन नाही का? आज, त्यापैकी बहुतेक जण जबरदस्तीने विस्थापित होतील आणि त्यांचे योग्य पुनर्वसन नाकारले जाईल, अशा भीतीखाली ते जगत आहेत, असे गायकवाड यांनी कल्याणकर यांचे लक्ष वेधले.
एकट्या मुंबई उत्तर मध्यवर्ती भागात, मला एसआरए प्रकल्पांमधील गैरप्रकारांबद्दल असंख्य तक्रारी आल्या आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल करण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले जात असून रहिवाशांचे जबरदस्तीने विस्थापन करण्यात येत आहे. वांद्रे (पूर्व) येथील बेहराम सुधार समिती एसआरएच्या रहिवाशांनीही विकासकाच्या अचानक बदलाबद्दल अशाच प्रकारची चिंता व्यक्त केली आहे. आम्ही किमान १४ ते १५ एसआरए योजनांमधील रहिवाशांच्या तक्रारींवर प्रकाश टाकला आहे. डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते या मुद्द्यांवर वैयक्तिकरित्या लक्ष देतील, परंतु आम्ही या मुद्द्यांचा पाठपुरावा करत राहू, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीसुद्धा भाजपमधील मराठी माणसाने फक्त सतरंज्या उचलायच्या आणि मलिदा मात्र उपऱ्या माेहीत कंबोजला मिळणार, असा उपराधिक टोला लगावला.
मुंबईच्या सफाई कामगारांची जागा आणि त्याच्या आजूबाजूचाही मोठा परिसर निविदा न काढताच एखाद्या व्यक्तीकडे जातोच कसा? याच संदर्भात आम्ही एसआरएच्या सीईओंची भेट घेत त्यांना विचारणा केली. त्याचे उत्तर आम्हाला मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे. एका पक्षाशी निगडित असलेल्या व्यक्तीला एसआरएचे 30 प्रकल्प कसे मिळतात? याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकपणे करावी. या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सफाई कर्मचार्यांना मुख्यमंत्री न्याय देतील व मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेच्या माध्यमातून डेव्हलप करतील, अशी मला अपेक्षा आहे.
वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस
कुठलेही सरकार कुठल्याही व्यक्तीला थेटपणे एसआरएचा प्रकल्प देऊ शकत नाही. 30 प्रकल्प तर सोडाच किमान 5 प्रकल्पांची यादी तरी वर्षा गायकवाड यांनी द्यावी. माझ्यावरचे आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी राजीनामा द्यावा. राजकारणासाठी माझे, माझ्या कंपनीचे नाव घेणे त्यांनी बंद करावे.