
आशिया कप २०२५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ७ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवस भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. या घटनेवर नाराजी व्यक्त करत पीसीबीने आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय खेळाडूंच्या कृतीत काहीही चुकीचे नव्हते, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करणे ही बंधनकारक परंपरा नसून फक्त सदिच्छा देण्याची गोष्ट आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. खेळाच्या शेवटी खेळाडूंना हस्तांदोलन करण्यास भाग पाडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. दोन्ही देशातील वाढत्या तणावामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करणे किंवा संवाद साधणे टाळले, असेही अधिकाऱ्याने म्हटले आहे.
‘जर तुम्ही आयसीसीच्या नियमांचे पुस्तक वाचले तर त्यात विरोधी संघाशी हस्तांदोलन करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नमूद केलेले नाहीये. हस्तांदोलन करणे ही एक सद्भावनापूर्ण कृती आहे. ही कृती कायदा नसून एका प्रकारची परंपरा आहे, ही परंपरा जगभरातील खेळांमध्ये पाळली जाते. जर हस्तांदोलन करण्याचा कोणताच कायदा नाहीय, तर भारतीय क्रिकेट संघ हा पाकिस्तानशी हस्तांदोलन करण्यास बांधील नाही’, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
पीसीबीने आयसीसीच्या आचारसंहिता आणि क्रिकेटच्या भावनेशी संबंधित एमसीसी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना सध्याच्या स्पर्धेतून तातडीने काढून टाकण्याची मागणी केली आहे. पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी ‘एक्स’ या माध्यमावर सांगितले की, आशिया कपमधील मॅच रेफरींच्या या कृतींबाबत त्यांनी आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हँडशेक वादावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताच्या विरोधात आयसीसीकडे तक्रार केली. यावर आयसीसीने पाकिस्तानचे कान टोचत त्यांची तक्रार नाकारली. हस्तांदोलन टाळल्याच्या घटनांमुळे आयसीसीकडे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. आयसीसीने या तक्रारीवर प्रतिक्रिया देत पाकिस्तानची मागणी फेटाळली आहे.