
आतमध्ये जे काही होतं ते हादरवणारं; अमेरिकन नागरिक…
गोरेगावमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 12 ला गोरेगाव (पूर्व) येथील विहान कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या सातव्या मजल्यावर बेकायदा कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली होती.
या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याचंही पोलिसांना समजलं होतं. यानंतर पोलिसांनी रात्री धाड टाकून कारवाई केली. यावेळी कारवाई करत एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेची कारवाई
गोरेगावमध्ये अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत दोन मालक, एक व्यवस्थापक आणि दहा टेलिकॉलर एजंटसह एकूण 13 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
रात्री टाकण्यात आला छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट 12 ला गोरेगाव (पूर्व) येथील विहान कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या सातव्या मजल्यावर एक बेकायदा कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याचंही पोलिसांना समजलं. माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री छापा टाकला.
आरोपी “गीक स्क्वॉड” आणि “मॅकॅफी अँटीव्हायरस नूतनीकरण” संबंधित बनावट ईमेल पाठवत असल्याचं धाड टाकल्यानंतर उघड झालं. ईमेलमध्ये टोल-फ्री क्रमांक देण्यात आले होते. एखाद्याने कॉल केल्यानंतर, आरोपी “EYEBEM” सॉफ्टवेअर वापरून त्यांच्या संगणकांवर रिमोट अॅक्सेस मिळवत असतं. त्यानंतर पीडितांना गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडलं जायचं, ज्याचे पैसे नंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले जात असत आणि फसवणूक व्हायची.
छाप्यात काय सापडलं?
पोलिसांनी छाप्यात 15 संगणक, 10 लॅपटॉप, 20 मोबाईल आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत. कॉल सेंटर बनावट असल्याचं सायबर तज्ज्ञांनी सांगितलं आहे.कायदेशीर कारवाई आणि ताबा
याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि आरोपींवर भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि दूरसंचार कायदा, २०२३ च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंततर सर्व 13 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट 12 सध्या पुढील तपास करत आहे.