
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवणारे मोदी त्यांच्या निर्भय आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत.
परंतु, 2029 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाची जबाबदारी कोण सांभाळेल?, असा प्रश्न सध्या देशभरात चर्चेत आहे. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी UPUK या संस्थेने नुकतेच सर्वेक्षण केले, ज्याचे निष्कर्ष धक्कादायक ठरले आहेत.
पुढचा पंतप्रधान कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबरला 75 वर्षे पूर्ण केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या अंतर्गत नियमांनुसार 75 वर्षांनंतर पद सोडण्याची परंपरा असल्याने अनेक नेत्यांची नावे पंतप्रधानपदासाठी चर्चेत आली आहेत. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा समावेश आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी यावर अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. भाजप नेते म्हणतात, ‘मोदीजींचे नेतृत्व अटळ आहे.’ पक्षांतर्गत सूत्रांनुसार, ही चर्चा निवडणूक धोरणाशी जोडली जाऊ शकते. तूर्तास, मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थिर असून, भविष्यातील निर्णयाची प्रतीक्षा आहे. पण नुकत्याच समोर आलेल्या सर्व्हेतून आश्चर्यकारक अशी नावे समोर आली आहेत.
UPUK चा सर्व्हे
सर्वेक्षणात UPUK ने जनतेसमोर तीन प्रमुख नावे ठेवली होती. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी. या तिन्ही नेत्यांपैकी जनतेने कोणाला मोदींचा उत्तराधिकारी म्हणून पसंती दिली? जाणून घेऊया.
योगी आदित्यनाथ अव्वल
सर्वेक्षणात 84 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधानपदासाठी सर्वोत्तम पर्याय मानले. योगींची कठोर प्रशासकीय शैली आणि हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून असलेली त्यांची ओळख जनतेला भावली आहे. त्यांचा दमदार नेतृत्वगुण आणि जनमानसातील प्रभाव यामुळे ते या यादीत आघाडीवर आहेत.
अमित शहा दुसऱ्या स्थानी
गृहमंत्री अमित शहा यांना 12 टक्के लोकांनी पसंती दिली. मोदींचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे शहा यांची पक्षावरील मजबूत पकड आणि कार्यक्षमता जनतेला विश्वास देणारी ठरली आहे.
नितिन गडकरी तिसऱ्या क्रमांकावर
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना केवळ 4 टक्के लोकांनी पसंती दिली. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि प्रभावी कार्यपद्धती असूनही, ते या यादीत मागे राहिले.