
मंत्र्यांना दिला काम करण्याचा डोस नाहीतर घरी घालवण्याचा इशारा !
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दुसरीकडे मात्र महायुती एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे ठरले आहे.
त्यामुळे वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी मंत्र्यांची कानउघाडणी केली आहे. त्यांनी जिल्ह्यात न येणाऱ्या पालकमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांनी येत्या काळात कामगिरीत सुधारणा केली नाही तर विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांच्या कामगिरीबाबत तक्रारी येत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे यांनी शिवसेना नेत्याच्या आढावा बैठकीप्रसंगी पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची कानउघडणी केल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची कॅबिनेटच्या बैठकीनंतर एक गुप्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्र्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारे दुर्लक्ष यावरून भरबैठकीतच संताप व्यक्त केला. अकार्यक्षम आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, तसेच मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारे दुर्लक्ष या मुद्द्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे पक्षवाढीकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले होते. मात्र पक्षवाढीकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे मंत्री कामच करणार नसतील तर त्यांच्याबाबत येत्या काळात विचार करावा लागेल, असा दमच शिंदे यांनी बैठकीप्रसंगी भरला आहे.
त्यासोबतच गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेच्या मंत्र्यांना जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना देऊनही त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. पक्षवाढीबाबत अनेक मंत्री कार्यरत नसल्याची तक्रार आहे. सोमवार ते बुधवार कॅबिनेटनंतर मतदार संघात उपस्थित राहण्याबाबत मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा शिंदे यांनी दिला आहे.