
बेस्ट परिवहन उपक्रमाला अखेर पूर्ण वेळ महाव्यवस्थापक मिळाले. राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस) 1994 च्या तुकडीच्या डॉ. सोनिया सेठी यांची बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्ती केली आहे.
त्यांनी शनिवार (27 सप्टेंबर) आपला पदभार स्वीकारला. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी पहिल्यांदाच महिला अधिकार्याची नियुक्ती झाली आहे.
बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी निवड व्हावी यासाठी पुर्वी चुरस पहावयाला मिळत असे. मात्र, बेस्टची आर्थिक परिस्थिती बिघडल्यानंतर हे पद भूषवणे अधिकार्यांना शिक्षा वाटत आहे. त्यामुळे या पदावर पूर्णवेळ काम करण्यास कोणी तयार नाही. आतापर्यंत अनेकांवर प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. आताही महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी वस्तू व सेवा कर आयुक्त आशिष शर्मा यांच्याकडे होती. परंतु आता बेस्टला पूर्णवेळ महाव्यवस्थापक मिळाले आहेत.
अनुभवाचा फायदा होणार का?
डॉ. सोनिया सेठी यांनी अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास केला असून ऑक्सफर्ड विद्यापीठातून मेजर प्रोग्राम मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी पायाभूत सुविधा वित्तपुरवठा या विषयात पीएचडी देखील केली आहे. परिवहन आयुक्त राहिलेल्या त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी आहेत. डॉ. सेठी यांना वाहतूक क्षेत्र आणि शहरी वाहतूक पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन याचा प्रचंड अनुभव आहे. याचा आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या बेस्टला मोठा फायदा होऊ शकतो.
4 वर्षांत 5 महाव्यवस्थापक
महाव्यवस्थापक पदाचा किमान तीन वर्षांचा कार्यकाळ असताना 2021 ते 2025 पर्यंत लोकेश चंद्र, विजय सिंगल व अनिल डिग्गीकर यांच्यावर बेस्टची जबाबदारी दिली. त्यानंतर नियुक्ती होऊनही हर्षदीप कांबळे हे रुजू न झाल्याने एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सहा महिने अतिरिक्त कार्यभार सांभाळला.