
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेले चॅलेंज हारल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. गुरुवारी झालेल्या दसरा मेळाव्यात ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला खरा पण फडणवीसांनी दिलेल्या मुद्यावर त्यांनी भाष्य करण टाळल्याचे निदर्शनास आले आणि हाच मुद्दा पकडत फडणवीसांनी ठाकरेंना टोले लगावले आहेत.
राज्यातील शेतकरी हताश झालाय, तो लढतोय. पण देवेंद्र फडणवीसांचा अजून अभ्यास सुरू आहे. तिकडे पंतप्रधान काहीही मदत करत नाहीत. बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर 10-10 हजार रुपये टाकले. पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही. यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी आभार मानत ठाकरेंनी माझे हजार रुपये वाचवले असा टोला लगावला.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेल. उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले. मी आवाहन केलं होतं, की उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही. परंतु मी पत्रकारांकडून माहिती घेतली. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही. त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एखादा व्यक्ती निराश झाला तर तो अदवातदवा बोलत असतो. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नसते, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला.