
म्हणाल्या पंकजा ताई…
बीडच्या सावरगाव घाटावरील भगवान गडावर मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्याला पंकजा मुंडेंचे बंधू आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे उपस्थित होते.
यावेळी धनंजय मुंडे यांनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यासोबतच धनंजय मुंडेंनी शायरीद्वारे मनातील खदखद व्यक्त केली. तसेच कठीण काळात मला माझ्या बहिणीने आधार दिला, असे विधान धनंजय मुंडेंनी दसरा मेळाव्याच्या भाषणात केले होते. आता यावर करुणा शर्मा- मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
गेले २५० दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला, असे विधान धनंजय मुंडेंनी केले होते. धनंजय मुंडे यांच्या याच विधानावर करुणा शर्मा-मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाऊ-बहिणीच्या संबंधांवर, साखर कारखान्यांवर आणि राजकारणातील गुंडगिरीच्या मुद्द्यांवरून टीका केली आहे.
कशाप्रकारे न्याय देतील?
2009 पासून 2022 पर्यंत जे दोन भाऊ-बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते आणि ज्या बहिणीला आज आधार मानतात, ती किती त्रास देत होती. तुम्ही माझ्या मांडीवर रात्री दोन-दोन, तीन वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटतो का? तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील, कशाप्रकारे न्याय देतील? असा सवाल करुणा मुंडे यांनी केला.
कारखाना तुम्ही बंद केला आणि गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले. आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे ३०-३०, ४०-४० कोटी दोघा कारखान्यांमध्ये अडकलेले आहेत पण तुम्ही देत नाही, असा गंभीर आरोपही करुणा मुंडेंनी केला.
जनतेची सेवा, शेतकऱ्यांची सेवेसाठी तुम्ही एकत्र आलेले नाही
आज पण तुमच्या सभांमध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले. हे संकेत आहे की काय पण असू द्या, आमच्या पोटाच्या पाणी वाल्मिक कराडशिवाय ना हलत होतं, ना हलणार.., त्यासाठी आज तुम्हाला परळीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नको आहे. जे गुंडागर्दी संपवतील. जरी माझ्यासारखा कोणी नवीन आला तर तो गुंडागर्दी संपवेल, राजकारण आहे ते संपवतील. त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई-बहीण एकत्र आलेले आहे. कोणत्याही जनतेची सेवा, शेतकऱ्यांची सेवेसाठी तुम्ही एकत्र आलेले नाही, असाही गंभीर आरोप करुणा मुंडेंनी केला.