
हुकूमशहाच्या कोठ्यावर मुजरे…
राष्ट्रीय संपत्तीची लूट ब्रिटिश काळात वाढली तेव्हा स्वराज्याचे आंदोलन सुरू झाले. लोक बेभान होऊन रस्त्यावर उतरले. गांधींच्या नेतृत्वाखाली लढा झाला व ब्रिटिशांना या देशातून हाकलून दिले गेले.
ब्रिटिशांची साम्राज्यशाही नष्ट केल्यावर भारतात लोकांचे राज्य आले. अर्थात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व नंतरच्या राष्ट्र उभारणीच्या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोठेच नव्हता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा साधा ओरखडाही संघाच्या वाटचालीवर उठला नाही. तरीही हे लोक स्वातंत्र्य, राष्ट्रवाद वगैरेंवर भाषणे झोडतात याचे आश्चर्य वाटते,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त नागपुरमध्ये पार पडलेल्या विजयादशमीच्या सोहळ्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणावरुन टीकास्र सोडताना ठाकरेंच्या शिवसेनेनं खरपूस शब्दात संघाचा समाचार घेतलाय.
असे प्रसंग सरसंघचालकांना रोमांचित करीत नाहीत
सोनम वांगचुक यांनी भारतमातेसाठी कष्ट घेतले. भारतीय सैनिकांसाठी संशोधन केले. चीन लडाखमध्ये घुसून भारतीय जमिनीवर ताबा मिळवत आहे, असे वांगचुक यांनी सांगताच त्यांना देशद्रोही ठरवून अटक केली. लडाखमध्ये जनतेचे आंदोलन झाले. ते आंदोलन भाजपच्या फसवणुकीविरुद्ध होते. आंदोलकांनी लडाखमधील भाजपचे कार्यालय जाळले. भाजपचा झेंडा जाळला, पण कार्यालयावरील भारतीय तिरंग्याचे रक्षण केले. असे प्रसंग सरसंघचालकांना रोमांचित करीत नाहीत,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
हे संघाचे पाप आज देशाच्या बोकांडी बसले
संघाला शंभर वर्षे झाली म्हणून त्याच्या नावाने पोस्टाचे तिकीट, खास नाणी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली, पण संघाने निर्माण केलेले भाजपचे नाणे खोटे आणि भ्रष्ट आहे. मोदी-शहांसारखे हुकूमशहा संघाने निर्माण केले व त्यांच्या हुकूमशाहीला बळ दिले हे संघाचे पाप आज देशाच्या बोकांडी बसले आहे. या मंडळींचा राष्ट्रवादाचा बुरखा रोज फाटत आहे. पहलगाम येथे 26 महिलांचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानबरोबर जय शहा भारतीय संघाला क्रिकेट खेळायला भाग पाडतात व जय शहांचे पिताश्री गृहमंत्री अमित शहा देशवासीयांना राष्ट्रवादाचे व्याख्यान देतात, पुन्हा हे सर्व लोक संघाचे स्वयंसेवक” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
तेव्हा काय करायचे?
लोकशाही मार्गानेच बदल शक्य आहे, पण लोकशाही, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट हुकूमशहाच्या कोठ्यावर मुजरे झाडू लागतात तेव्हा काय करायचे? सरसंघचालकांनी देशाला यावर मार्गदर्शन करणे आवश्यक होते, असं लेखात म्हटलं आहे.